दीक्षाभुमीवर आवश्यक सुविधांची नियोजनबद्ध तयारी करा
महापौरांनी घेतला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्व तयारीचा आढावा
Date : 01 Sep 2026
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने दीक्षाभूमीवरील सुविधांचा आढावा महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.१) घेण्यात आला. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, मनपा आयुक्त डॉ. विपीन, परिवहन समिती सभापती श्रीमती मंगला खेकरे, लक्ष्मीनगर झोन सभापती श्रीमती तारा यादव, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, पोलीस उपायुक्त श्री. ऋषिकेश रेड्डी, श्री.संदीप पखाले, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री.मिलिंद मेश्राम, उपायुक्त श्री. राजेश भगत, मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, सहायक आयुक्त श्री. धनंजय जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता श्री. विजय गुरुबक्षाणी, श्री राजेंद्र राठोड, श्री. रवींद्र बुंधाडे, श्री. श्रीकांत वाईकर, प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत नागार्जुन सुरई ससाई यांच्यासह झोनल स्वच्छता अधिकारी, एनएमआरडीए, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशभरातून लाखोंच्या संख्येत बौद्ध अनुयायी नागपूर शहरातील दीक्षाभूमीला भेट देतात. या सर्व नागरिकांच्या सोयीसाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे १८ ते २२ ऑक्टोबर या कालावधीमध्ये सर्व मुलभूत सुविधांची व्यवस्था करण्याचे निर्देश महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी बैठकीमध्ये दिले. नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच त्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करणे, संपूर्ण परिसरात स्वच्छता राखणे, सर्वत्र विद्युत पुरवठा करणे, पिण्याचे पाणी, शौचालय, परिवहन सेवा या सर्व सुविधा सुरळीतपणे चालविल्या जातील, या दृष्टीने नियोजन करण्याचेही त्यांनी निर्देशित केले.
तसेच मनपा अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी व इतर विभागांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पाहणी करून आवश्यक त्या सुविधा पुरविण्याच्या सूचना आयुक्त डॉ. विपीन यांनी दिल्या. तसेच अंबाझरी तलावावर अनुयायी मोठ्या संख्येत आंघोळीसाठी जात असतात या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन विभागाची चमू, बोट तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन चमू तैनात करण्याचे ही निर्देश आयुक्तांनी दिले. दीक्षाभूमीच्या परिसरात लावण्यात येणा-या स्टॉलवर कुठेही सिलेंडर अथवा तत्सम ज्वलनशील वस्तूंचा वापर होऊ नये याबाबत विशेष काळजी घेण्याचे निर्देशही मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी दिले आहेत. बैठकीच्या प्रारंभी अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम यांनी मनपाद्वारे उभारण्यात येणाऱ्या विविध सोयीसुविधांची माहिती दिली.