अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा मनपा आयुक्तांकडून आढावा
Date : 01 Sep 2026
बैठकीला अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, उपायुक्त श्री. मंगेश खवले, उपायुक्त श्री. गणेश राठोड, मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, सर्व झोनचे सहाय्यक आयुक्त तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शहरातील विविध झोनमध्ये करण्यात आलेल्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा आढावा घेताना आयुक्तांनी सहाय्यक आयुक्तांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कारवाईचे नेतृत्व करण्याचे निर्देश दिले. तसेच प्रत्येक झोनमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांची १० प्रमुख ठिकाणे निश्चित करावीत आणि दररोज किमान ५ किलोमीटर परिसरात प्रभावी कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांवर भरणाऱ्या आठवडी बाजारांची झोननिहाय माहिती संकलित करून आठवडाभरात सादर करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. रस्त्यांवरील आठवडी बाजारांमुळे वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांच्या दैनंदिन वावरावर परिणाम होणार नाही, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कमकुवत व धोकादायक इमारतींमुळे नागरिकांच्या जीवितास तसेच मालमत्तेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी अशा इमारतींची तातडीने पाहणी करून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच शहरातील अनधिकृत गोदामांची माहिती संकलित करून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिली.
अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवरील कारवाईदरम्यान आवश्यकतेनुसार संबंधितांविरोधात एफआयआर दाखल करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले.