राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पाहुण्यांची मनपाच्या मारबत महोत्सवाला हजेरी
स्थायी समिती सभापती यांनी घेतला मनपाच्या मारबत महोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा
Date : 02 Sep 2026
बैठकीला सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र(बाल्या) बोरकर, श्रीमती आभा पांडे, क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, पोलीस उपायुक्त (वाहतूक) श्री. आदित्य मिरखेलकर, नगरसेवक श्री. सुधीर (बंडू) राऊत,महिला व बालकल्याण विशेष समिती सभापती श्रीमती सारिका नांदुरकर, नगरसेविका श्रीमती वैशाली उदापुरकर, श्रीमती रामा उईके, श्रीमती अभिरुची राजगिरे, नगरसेवक तुषार लारोकर, श्रीमती रेखा निमजे, नगरसेविका श्रीमती चेतना निमजे, श्रीमती उमा देशमुख, श्रीमती कल्पना शर्मा, श्री. रामभाऊ आंबुलकर, श्री. संजय अवचट, मनपाचे उपायुक्त श्री. राजेश भगत, उपायुक्त श्री. मंगेश खवले, यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी व श्री. विवेक रानडे प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांनी सांगितले की, १४५ वर्षांचे ऐतिहासिक महत्त्व मारबत उत्सवाला प्राप्त आहे. यंदाच्या मारबत महोत्सवात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातनाम व्यक्ती व सिनेअभिनेता यांची उपस्थिती लाभणार आहे. यासोबतच राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री एॅड.आशिष शेलार यांच्या हस्ते ६ सप्टेंबर रोजी काळी व पिवळी मारबत यांची विधिवत पूजा केली जाणार आहे. तसेच हेरीटेज वॉक देखील आयोजित केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, मारबत च्या मूळ संकल्पनेला बाधा न पोहोचविता या महोत्सवाला जागतिक पातळीवर घेऊन जाण्याचा हा प्रयत्न आहे. नागपूरची ऐतिहासिक संस्कृती जपणाऱ्या या महोत्सवात नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग राहावा आणि शहराचे वैभव जगासमोर यावे, यासाठी मनपाद्वारे मारबत महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. “ईडा पिडा घेऊन जा गे मारबत” असे बोधचिन्ह, मोमेंटो, भेट वस्तू महोत्सवात येणाऱ्या नागरिकांना देण्याचा मानस असून, या भेटवस्तू प्राप्त करण्यासाठी “बुक माय शो” या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे. पोलीस विभाग, मनपा प्रशासन व संबंधित इतर विभागांनी सुनियोजित व्यवस्था करण्याचे निर्देश श्रीमती शिवानी दाणी वखरे यांनी दिले. सत्तापक्ष नेते श्री.नरेंद्र(बाल्या) बोरकर यांनी आयोजनासाठी स्थानिक नगरसेवकांच्या सूचनांचा विचार करण्यात यावा अशी सूचना केली. तर मिरवणूकीच्या मार्गावरील विजेच्या तारा व इतर अडथळे दूर करण्याच्या सूचना श्री. सुधीर राऊत व श्रीमती आभा पांडे यांनी यावेळी दिले.