स्वच्छ वायू सर्वेक्षण - २०२६: नागपूर शहराची उल्लेखनीय कामगिरी
महाराष्ट्रात तिसरा क्रमांक
Date : 07 Sep 2026
या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना माननीय महापौर श्रीमती निता ठाकरे आणि मनपा आयुक्त डॉ विपीन यांनी नागपूरकर जनतेचे अभिनंदन केले आहे. उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्ता पक्ष नेता श्री नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी सुद्धा याकामगिरीवर जनतेचे अभिनंदन केले आहे.
मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात नागपूर प्रगतीच्या वाटेवर वाटचाल करीत आहे. 'नागपूरकरांचे आरोग्य आणि स्वच्छ हवा, हे आमचे मुख्य ध्येय आहे. या दिशेने आम्ही करत असलेल्या प्रयत्नांना हे यश यश मिळाले आहे. हे यश नागपूर शहराला देशातील प्रमुख राहण्यायोग्य शहरांपैकी एक बनवण्यासाठी प्रेरणादायी ठरेल.'
मनपा आयुक्त डॉ विपीन यांनी प्रशासनाच्या आणि नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांना या यशाचे श्रेय दिले. 'महापालिकेची स्वच्छ हवा कृती आराखडा (Clean Air Action Plan) प्रभावीपणे राबवण्यासाठी आमचे विविध विभाग आणि कर्मचारी सातत्याने काम करत आहेत. नागरिकांनी दिलेल्या सहकार्यामुळेच आपण हा टप्पा गाठू शकलो. यापुढेही वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आणखी प्रभावी उपाययोजना राबवण्यात येतील,' असे त्यांनी नमूद केले.
नागपूर महानगरपालिका तर्फे वायू प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून यात मोठा सहभाग पर्यावरण पुरक इ बसेस चा आहे. नागपूरात वृक्षारोपणाचा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या सुद्धा लाभ येणाऱ्या वर्षात पाहायला मिळणार आहे.