जन्म-मृत्यू नोंदणीची प्रलंबित प्रकरणे निकालात काढा
महापौर निता ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश
Date : 09 Sep 2026
जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्रे घेण्यासाठी अनेकजण मनपाच्या कार्यालयांमध्ये अर्ज करतात परंतु त्यांना प्रमाणपत्रे प्राप्त होण्यास वेळ लागत असल्याच्या तक्रारींवर निर्णय घेण्यासाठी महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. 9) डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात बैठक पार पडली. यावेळी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, आरोग्य समितीच्या सभापती श्रीमती मनीषा अतकरे, अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, सहाय्यक आयुक्त श्री. धनंजय जाधव, श्री. राजकुमार मेश्राम, श्री. प्रमोद वानखेडे, विकास रायबोले, डॉ. नवघरे व झोनचे स्वच्छता अधिकारी उपस्थित होते.
जन्म-मृत्यू विभागाचे प्रमुख डॉ.गोवर्धन नवखरे यांनी पीपीटीच्या माध्यमातून विभागाच्या कामाचे तसेच विभागाच्या कार्यपद्धतीबद्दल माहिती दिली. प्रलंबित प्रकरणे त्वरित निकालात काढण्यासाठी काही कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले. जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी नागरिकांना विनाकारण त्रास होणार नाही, याची काळजी अधिकारी व कर्मचार्यांनी घ्यावी, असेही निर्देश महापौरांनी यावेळी दिले. जन्म-मृत्यू नोंदणी अर्जाची सद्यस्थिती समजून घेण्यासाठी संगणकीय प्रणाली सुरू करावी, अशी सूचनाही महापौर श्रीमती ठाकरे यांनी केली.