विकासकामांच्या प्रस्तावांना लवकरात लवकर मंजुरी द्या : महापौर
Date : 09 Sep 2026
महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली विकासकामांच्या संदर्भात महत्त्वाची आढावा बैठक बुधवारी (ता. ९) मनपाच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात पार पडली. बैठकीत स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, अतिरिक्त आयुक्त श्री. मुरुगानंथम एम. अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सदाशिव शेळके, अधीक्षक अभियंता श्री. विजय गुरूबक्षाणी, उपायुक्त श्री. राजेश भगत, श्री. मंगेश खवले, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्यासह सर्व झोनचे सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिकेच्या कामकाजात अधिक पारदर्शकता, सुसूत्रता आणि गतिमानता आणण्याच्या उद्देशाने 'वर्क्स मॅनेजमेंट सिस्टम' ही नवीन डिजिटल कार्यप्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून विविध विकासकामांना मंजुरी दिली जात आहे.
बैठकीत मार्गदर्शन करताना महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी सांगितले की, मनपाच्या अर्थसंकल्पात विकासकामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली असून, या नवीन कार्यप्रणाली मुळे नगरसेवकांच्या प्रस्तावांना अधिक गती मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तर सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र बोरकर यांनी सांगितले की, "प्रत्येक अभियंत्याने आपल्या इनबॉक्समधील फाईल्स आणि प्रस्तावांना दररोज मंजुरी देणे आवश्यक आहे. कोणत्याही कामाला अनावश्यक विलंब होऊ देऊ नये आणि प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी.
माहिती व तंत्रज्ञान विभाग संचालक श्री. मिलिंद मेश्राम यांनी या प्रणालीची माहिती देताना सांगितले की, या डिजिटल व्यासपीठावर कामांशी संबंधित सर्व कागदपत्रे, प्रगतीपथावरील कामांचा मागोवा आणि कर्मचाऱ्यांच्या कामाचा तपशील एकाच ठिकाणी उपलब्ध होत आहे. नागरिकांना जलद सेवा देण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्या पुढाकाराने आणि अतिरिक्त आयुक्त श्री. मुरुगानंथम एम. यांच्या नियोजनातून ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. माहिती व तंत्रज्ञान अधिकारी श्री. स्वप्निल लोखंडे यांनी ही यंत्रणा राबवली असून, मे. मार्स टेलिकॉम सिस्टीम प्रा. लि. हैदराबाद यांच्याद्वारे ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या नवीन डिजिटल कार्यप्रणालीमुळे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना कामाचा आढावा घेणे अतिशय सुलभ झाले आहे.