शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मनपाच्या पीएमश्री लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयाला भेट
मनपाच्या व आकांक्षा फाउंडेशनच्या शालेय उपक्रमांचे मंत्री महोदयांनी केले कौतुक
Date : 09 Sep 2026
यावेळी माननीय महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लीला हाथीबेड, अतिरिक्त आयुक्त श्री. मुरुगानंथम एम, शिक्षण विशेष समिती सभापती श्रीमती संतोषदेवी लड्ढा, शिवसेनाचे गट नेते श्री. गणेश चार्लेवार, उपसभापती श्रीमती भारती बुंदे, नगरसेविका श्रीमती मंगला मस्के, श्रीमती मानसी शिमले, नगरसेवक श्री. चंद्रकांत खांगर, नगरसेविका श्रीमती वैशाली उदापुरकर, नगरसेविका श्रीमती सय्यद मुस्कान, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, शिक्षणाधिकारी श्री. अमित भदाणे, उपशिक्षणाधिकारी श्री. सुभाष उपासे, मुख्याध्यापिका श्रीमती सीमा जयसिंघानी यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
शिक्षणमंत्री श्री. भुसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व माजी पंतप्रधान भारतरत्न श्री. लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून शाळेच्या पाहणीला सुरुवात केली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक शिक्षणावर भर देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. प्रत्येक शनिवारी सर्व शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर आधारित कवायत नियमितपणे घेण्यात यावी, असे ही त्यांनी सांगितले. शारीरिक शिक्षणासाठी प्रत्यक्ष खेळाडू व माजी सैनिकांना प्राधान्य देण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या. तसेच ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण शिबिर’ मनपा शाळांमध्येही राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी मनपा शाळांमधील विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती देत १० व्या वर्गापर्यंत शिक्षण व्यवस्था असलेल्या शाळांना सीबीएसई प्रमाणे चालविण्याचे तसेच आवश्यक ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यासाठी शासनाची मान्यता देण्याची मागणी केली. यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्यात यावा, त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री श्री. भुसे यांनी दिले.
हनुमाननगर येथील शाळेतील शैक्षणिक उपक्रमांचा आदर्श घेऊन अशा प्रकारच्या गुणवत्तापूर्ण सुविधा व उपक्रम इतर मनपा शाळांमध्येही राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मनपा व आकांक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या शैक्षणिक उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. कमी पटसंख्या असलेल्या व बंद होण्याच्या स्थितीत असलेल्या शाळांचा दर्जा उंचावून समाजातील सर्व स्तरांतील पालकांचा या शाळांकडे ओढा निर्माण होईल, अशा पद्धतीने शाळांचा विकास करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
शारीरिक शिक्षण शिक्षकांची कमतरता, शाळांच्या विकासासाठी आवश्यक निधी तसेच मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशासोबत देण्यात येणारे बूट अद्याप प्राप्त न झाल्याची बाब महापौरांनी निदर्शनास आणून दिली. याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती त्यांनी केली. शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या सूचना व अडचणीही माननीय शिक्षणमंत्र्यांनी जाणून घेतल्या.
मनपा शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक पायाभूत सुविधा, क्रीडा व आत्मरक्षा प्रशिक्षणासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून, शासनाच्या सहकार्याने मनपा शाळांचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावून त्यांना विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण व आकर्षक शिक्षणाचे केंद्र बनविण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू राहतील, असे माननीय महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी यावेळी सांगितले.