जागतिक स्तरावर झळकणार नागपूरचा ऐतिहासिक 'मारबत महोत्सव'
मनपातर्फे जय्यत तयारी
Date : 09 Sep 2026
पत्रकार परिषदेला महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र(बाल्या) बोरकर, क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड, अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
महोत्सवाची सुरुवात राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या प्रमुख हस्ते पिवळी व काळी मारबत यांची विधिवत पूजा करून झाली आहे. येत्या ११ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित मारबत महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मनपाच्या विभाग प्रमुखांवर विशेष जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. शहराच्या विविध भागांत खालील प्रमुख चौकांमध्ये मारबत उत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. मनपाचा मुख्य कार्यक्रम गांधीपुतळा चौक येथे होणार आहे. तर मनपाद्वारे स्वागत गेट, संपूर्ण महोत्सव मार्गाची सजावट, मारबतचे स्वागत, स्वागत मंच आदी व्यवस्था करण्यात येणार आहे.
मनपातर्फे स्वागत मंच
Ø पिवळी मारबत कुंभारपुरा चौक, गोळीबार चौक, भारत माता चौक, शहीद चौक व टांगा स्टँड चौक, गांधीपुतळा चौक (मुख्य कार्यक्रम स्थळ), कोतवाली चौक, मस्कासाथ छोटेलाल हलवाई समोर स्वागत मंच उभारण्यात येणार आहे
आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय मान्यवरांची उपस्थिती
१४५ वर्षांचे गौरवशाली ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या या मारबत महोत्सवाला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी मनपातर्फे विशेष नियोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी, पालक मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री श्री. आशिष जैस्वाल तसेच परदेशातून वाणिज्य राजदूत (Consul General), विविध देशांचे प्रतिनिधी, इतर मानननीय मंत्री महोदय, सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आणि प्रसिद्ध सिनेअभिनेते उपस्थित राहणार आहेत. यात फ्रान्स, इटली, फिनलंड, नॉर्वे यांच्या मा.वाणिज्य राजदूत यांचा समावेश आहे. तसेच सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्री. सुभाष घई, श्री. जय मेहता, सुप्रसिद्ध अभिनेते श्री. जॅकी श्रॉफ, श्री. आरती वेले, संपादक श्री. निलेश खरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विशेषः म्हणजे, नेहरू पुतळा चौकात मा.वाणिज्य राजदूत यांना मिलन बघता यावे याकरीत बिल्डींगवर व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण युसीएन वर केले जाणार आहे.
ऐतिहासिक छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनी (१० व ११ सप्टेंबर)
मारबत महोत्सवाचा इतिहास आणि जुन्या आठवणी नव्या पिढीसमोर आणण्यासाठी मनपातर्फे १० व ११ सप्टेंबर रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहाच्या तळमजल्यावरील प्रदर्शन हॉलमध्ये एका भव्य छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.
वेळ: सकाळी १०:०० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत (नागरिकांसाठी खुले). संयोजन: या विशेष छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनीचे संपूर्ण संयोजन 'ऑरेंज सिटी फोटोग्राफर क्लब'चे श्री. गजानन रानडे यांच्यातर्फे पाहिले जात आहे.
नागरिकांना आवाहन: नागरिकांच्या संग्रही असलेले मारबतीचे जुने व ऐतिहासिक छायाचित्र क्लबच्या ocpc.ngp@gmail.com या अधिकृत ईमेलवर पाठवून या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्लास्टिकमुक्त नागपूरचा संकल्प व विद्यार्थी सहभाग
पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि 'प्लास्टिकमुक्त नागपूर' ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मनपाच्या तसेच खाजगी शाळांच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्लास्टिक संकलनाचे विशेष अभियान राबविले जात आहे. नागपूरच्या या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा साक्षीदार होण्यासाठी आणि मारबत महोत्सवाचा उत्साह अधिक द्विगुणीत करण्यासाठी समस्त नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.