गठई कामगारांना स्टॉल देण्यास गती द्यावी
महापौर श्रीमती निता ठाकरे यांचे मनपा प्रशासनाला निर्देश
Date : 09 Sep 2026
संत रविदास आश्रय योजनेअंतर्गत गठई कामगारांना शहरात उपलब्ध करून द्यावयाच्या योजनेच्या संदर्भात महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी आज (ता. 9) डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात बैठक घेतली. यावेळी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, नगरसेवक योगेश पाचपोर, अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, उपायुक्त श्री. मंगेश खवले, अधीक्षक अभियंता श्री. विजय गुरुबक्षानी, सहाय्यक आयुक्त श्री. प्रमोद वानखेडे, श्री. राजकुमार मेश्राम, व चर्मकार सेवा संघाचे अध्यक्ष श्री. भैय्यासाहेब बिघाणे उपस्थित होते.
राज्य सरकारच्या शासन आदेशानुसार (जीआर) संत रविदास आश्रय योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत चर्मकार व गठई कामगारांना रस्त्याच्या कडेला दुकानासाठी स्टॉल उपलब्ध करून दिल्या जाते. या संदर्भात मनपाकडे काही प्रकरणे प्रलंबित आहेत किंवा काही अर्जांवर अद्यापही निर्णय झाला नाही, असे निवेदन नगरसेवक श्री. योगेश पाचपोर व श्री. भैय्यासाहेब बिघाणे यांनी केले.
मनपाकडे असलेल्या अर्जांवर तात्काळ निर्णय घ्यावा, तसेच अर्जात त्रुटी असल्यास त्या संदर्भात अर्जदाराला रितसर कळवावे त्याचप्रमाणे रितसर परवानगीने असलेल्या गठई कामगारांच्या स्टॉलवर अतिक्रमण विभागाने कारवाई करू नये, असेही निर्देश महापौर श्रीमती ठाकरे यांनी दिले. मेट्रो स्टेशनच्या जागेत गठई कामगारांना जागा देण्याच्या संदर्भात सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही महापौरांनी यावेळी सांगितले.