मारबत महोत्सवानिमित्त छायाचित्र प्रदर्शनाचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन
Date : 10 Sep 2026
या प्रसंगी ऑरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबचे अध्यक्ष श्री. महेश काळबांडे, ऑरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबचे सचिव श्री. नरेश नेरकर, ऑरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबचे कोषाध्यक्ष श्री. नितेश बाहे तसेच क्लबचे सदस्य, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी सांगितले की, नागपूरच्या प्रसिद्ध अशा मारबत परंपरेला बघण्यासाठी दरवर्षी दीड ते दोन लाख नागरिकांची गर्दी असते, पण तरीही अजूनही मोठ्या संख्येतील नागरिकांना याविषयी माहिती नाही हे ही तितकेच सत्य असल्याने अशा एका जुन्या पारंपरिक उत्सवाला नागरिकांपर्यंतच नव्हे तर देशभरात आणि जगभरात प्रचारित व प्रसारित करण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मारबत महोत्सव घेण्यात आला. यातील एक महत्वाचा कार्यक्रम म्हणजे छायाचित्र प्रदर्शनी होय, ऑरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लब यांच्या सहकार्याने शहरातील पारंपरिक उत्सवाचे देखणे दृश्य हे शहरातीलच नव्हे तर बाहेरून उत्सव बघायला येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांना बघता येणार आहे. या माध्यातून हा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहचवणे शक्य होणार आहे. यावेळी महापौरांनी ऑरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबच्या सर्व सदस्यांचे आभार मानले व त्यांच्या उत्कृष्ट कामगीरी व त्यांनी आयोजनात दिलेल्या प्रत्यक्ष सहभाग करिता कौतुक केले.
महापौरांनी शुक्रवारी होणाऱ्या मारबत कार्यक्रमाची माहिती देतांना मुख्यमंत्री ना. श्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी, पालकमंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीसह विदेशातून इटली व फ्रांससह अजून दोन देशाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. यामुळे जागतिक स्तरावरही मारबत्तीच्या परंपरेची आणि केवळ नागपुरात होणाऱ्या सणाची माहिती मिळेल असे मत व्यक्त केले.
यावेळी उपस्थित सदस्य, नागरिकांनी प्रदर्शनातील विविध सुंदर छायाचित्रांचा डोळे भरून आनंद घेतला. मारबत समयीचे विविध दृश्य, जनतेच्या उत्साहात मारबतीचे आगमन ते मारबतीला दहन करण्या पर्यंतचे निरनिराळे क्षण, यावेळी स्थानिक संस्कृतीतील प्रात्यक्षिकांचे असे अनेक कलात्मक आणि नाविन्यपूर्ण छायाचित्रांनी भरलेल्या प्रदर्शनाला बघण्याचा आनंद घेतला. विशेष म्हणजे जुन्या काळापासून तर मागील वर्षीच्या मारबत उत्सवातील क्षणापर्यंत अनेक छायाचित्र विविध छायाचित्रकारांच्या माध्यमातून टिपून प्रदर्शनीत निवडण्यात आले आहे. सोबतच छायाचित्र स्पर्धेसाठी ५ छायाचित्रांची निवड करण्यात आली.
महापौरांच्या उपस्थितीत निकाल घोषित करण्यात आला. श्री. अनिरुद्ध सिंग दिनोरे हे प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले. द्वितीय पुरस्कार श्री. राहुल मिश्रा, तृतीय पुरस्कार श्री. युगल सावरकर, प्रथम उत्तेजनार्थ श्रीमती स्नेहल सोनटक्के, तर द्वितीय उत्तेजनार्थ पुरस्कार श्री. देवांशु उकळे यांना मिळाला. स्पर्धेचे परीक्षण छायाचित्रकार श्री. नाना मिसाळ व छायाचित्रकार श्री. विनोद राऊत यांनी केले. पुरस्कार समारंभ शुक्रवारी आयोजित करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन ऑरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबचे माजी अध्यक्ष श्री. गजानन रानडे यांनी केले.