आज मनपा मुख्यालयात रक्तदान शिबीर मनपा आजपासून सेवा संकल्प अभियान राबविणार
लोकोपयोगी योजना, विविध स्पर्धा व स्वच्छतेवर राहणार भर
Date : 16 Sep 2026
राज्य सरकारच्या निर्देशानुसार १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरपर्यंत सेवा संकल्प महिन्याअंतर्गत विविध लोकोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर व आयुक्त डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनात रक्तदान शिबीर मनपाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आयोजित केले आहे. यासंदर्भात महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत आयुक्त डॉ. विपीन यांनी सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ रक्तदान शिबीराने होणार असल्याचे सांगून यात मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी सहयोग नोंदवावा, असे आवाहन केले.
राज्य सरकारने जारी केलेल्या निर्देशानुसार या महिन्यात समाजातील सर्व घटकांपर्यंत केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती देणे, या योजनांअंतर्गत लोकांसाठी विशेष शिबीर आयोजित करणे, सेवा सेतू केंद्र सुरू करणे, प्रत्येक झोनमध्ये नागरिकांसाठी समाधान शिबीर आयोजित करणे, आयुषमान कार्ड देणा्यासाठी शिबीर आयोजित करणे, युवकांसाठी मेराथॉन स्पर्धा व बाईक रॅली आयोजित करणे, शहरात स्वच्छता अभियान राबविणे, मुलांसाठी विकसित भारत या संकल्पनेवर आधारित चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणे, याशिवाय रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबीर, युवकांसाठी करिअर कौन्सिलिंग सत्र, प्लास्टिक मुक्तीसाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी अभियान राबविणे, सायबर गुन्ह्यासंदर्भात लोकांमध्ये जनजागृती करणे, ज्येष्ठ नागरिकांमध्ये डीजीटल साक्षरता करण्यासाठी शिबीर आयोजित करणे, विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी शिबीर आयोजित करण्याचे विविध कार्यक्रम आयोजित केले आहे.