अमृत-2’ अंतर्गत सर्व कामे मार्चअखेर पूर्ण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पोहरा नदी पुनरुज्जीवनासह विविध कामांचा आढावा
Date : 19 Sep 2026
शहरात 'अमृत २' योजनेअंतर्गत सुरू असलेली विकासकामे आणि पोहरा नदीचे प्रदूषण निर्मूलन व पुनरुज्जीवन या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रामगिरी शासकीय निवास येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीत आमदार श्री. प्रवीण दटके, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, मनपा आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, मुख्यमंत्री यांच्या ओएसडी श्रीमती आशा पठाण, नगरसेवक श्री. दिलीप दिवे, श्री. रितेश गावंडे, श्री. महेंद्र भुगावकर, श्री. विनोद शिंदे, श्री. ईश्वर ढेंगळे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्री. संभाजी माने, अधीक्षक अभियंता श्रीमती नीता ठाकरे, मनपाच्या मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, सहायक आयुक्त श्री. धनंजय जाधव, कार्यकारी अभियंता श्री. राजेश दुफारे, श्री. राजीव गौतम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान 'अमृत २' योजनेअंतर्गत शहरात सुरू असलेल्या रस्ते खोदकाम व त्यानंतरच्या पुनर्भरण (restoration) कामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीत उपस्थित नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील खोदकाम व पुनर्भरणच्या कामाबद्दल समस्या मांडल्या. तसेच नगरसेवकांनी रिंग रोड वरील सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे सुरू असलेल्या कामाबद्दलही रोष व्यक्त केला. यावेळी आमदार प्रवीण दटके यांनी नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांनी पावसळ्यात नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दलची माहिती मुख्यमंत्री यांना दिली.
यावर बोलताना मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सिमेंट रस्त्यांवर पुनर्भरण किंवा खड्डे बुजविण्याचे काम करताना कोणत्याही प्रकारची तडजोड न करता शास्त्रीय व वैज्ञानिक पद्धतीचा (Scientific Method) सक्तीने अवलंब करण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश दिले. तसेच, भविष्यात शहरात होणाऱ्या रस्ते खोदकाम आणि त्यानंतरच्या पुनर्भरण प्रक्रियेसंदर्भात संबधित सर्व विभागांची संयुक्त बैठक बोलावून एक सर्वसमावेशक व कडक 'धोरण' तयार करण्यात यावे, अशा सक्त सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तसेच कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर सक्त कारवाई करण्याची ताकीदही त्यांनी दिली. याशिवाय सर्व कामांसाठी संबधित विभागांनी योग्य समन्वय साधून कार्य करण्याचे सुचाविले.
बैठकीत सर्वप्रथम मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी संगणकीय सादरीकरण करीत 'अमृत २' योजनेच्या कामांसोबतच आणि पोहरा नदीचे प्रदूषण निर्मूलन व पुनरुज्जीवन प्रकल्पावरही सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट(एसटीपी) बद्दलची माहिती सादर केली. तसेच, जयताळा येथे १० एमएलडी, चिखली येथे ३५ एमएलडी एसटीपी उभारण्यात येणार असून, चिंचभवन, बीडीपेठ, सोमलवाडा येथे पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याचे सांगितले.