श्रीगणेशाच्या १ लाख ५४ हजार ५०६ मूर्तींचे विसर्जन
मनपाच्या पर्यावरण पूरक श्री गणेश मूर्ती विसर्जनाला नागरिकांची साथ
Date : 26 Sep 2026
महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र(बाल्या) बोरकर, विरोधीपक्ष नेते श्री. संजय महाकाळकर, मनपा आयुक्त डॉ.विपीन, वैद्यकीय आरोग्य विशेष समिती सभापती श्रीमती मनीषा अतकरे यांच्यासह इतर सर्व झोन सभापती, अधिकारी व कर्मचारी यांच्या नेतृत्वात बाप्पांच्या पर्यावरणपूरक निरोपासाठी मनपाने जय्यत तयारी करण्यात आली. पहिल्या दिवसापासून तर बाराव्या दिवसापर्यंत शहरातील सर्व विसर्जन कुंडांवर एकूण १ लाख ५४ हजार ५०६ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
शहरात पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जनासाठी दहाही झोन अंतर्गत २२५ ठिकाणी ४६५ कृत्रिम हौद तयार करण्यात आले. यात घरच्या श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नागरिकांनी मनपाच्या कृत्रिम तलावांचा मोठ्या प्रमाणात वापर केला. विशेष म्हणजे, नागरिकांना घराजवळच्या कृत्रिम तलावांची माहिती सहज उपलब्ध व्हावी याकरिता मनपाद्वारे क्यूआर कोड आणि संकेतस्थळाची सोय उपलब्ध करून दिली.
महापौर आयुक्तांनी केले विसर्जन
गणपती बाप्पा मोरया...!, पुढच्या वर्षी लवकर या!...अशा घोषणा देत मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी कुटुंबातील श्री. गणेशाला भावपूर्ण निरोप दिला.मनपाद्वारे उभारण्यात आलेल्या
पर्यावरणपूरक कृत्रिम तलावांमध्ये ढोल ताशांच्या गजरात विसर्जन करण्यात आले. तर आयुक्त डॉ. विपिन यांनी देखील मनपा आयुक्त डॉ. विपीन व त्यांच्या कुटुंबियांनी निवासस्थानी विराजमान श्री गणेशाला भक्तीभावाने निरोप दिला. यावेळी श्री गणेश मूर्तीचे विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन कुंडात केले.
लकडगंज भागातील सरदार वल्लभभाई पटेल मैदान कच्छीविसा येथील कृत्रिम तलावात अनंत चतुर्दशीला गणेशभक्तांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर अशा घोषणा देत श्री. गणेशाला भावपूर्ण निरोप देत पर्यावरणपूरक कृत्रिम तलावांमध्ये ढोल ताशांच्या गजरात विसर्जन केले. सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्या मार्गदर्शनात व सद्भावना सांस्कृतिक क्रीडा मंडळ व बहु. संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने अत्यंत सुलभपणे रात्री उशिरापर्यंत श्री. गणेशाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी विविध संस्थाच्या युवकांनी ढोलताशे व लेझिम खेळाचे चित्तथरारक प्रदर्शन केले.
मनपा आयुक्त यांच्यासह पोलिस आयुक्त यांची पाहणी
मनपा प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांनी केलेल्या व्यवस्थेची पोलीस आयुक्त श्री विश्वास नांगरे पाटील आणि मनपाचे आयुक्त डॉ.विपिन यांनी पाहणी केली. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री राजेंद्र दाभाडे,पोलीस उपायुक्त श्रीमती अन्नपूर्णा सिंग, मनपाचे उपायुक्त श्री राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता श्री.राजेंद्र राठोड यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पोलीस आयुक्त श्री विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विसर्जनस्थळे आणि प्रमुख मार्गांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.
श्री गणेश मूर्तींचे झोननिहाय विसर्जन
लक्ष्मीनगर झोनमध्ये ४१ कृत्रिम तलाव उभारण्यात आले असून, दहाव्या दिवशी २४ हजार ६६१ मातीच्या तर १ हजार २०६ पीओपीच्या अशा एकूण २५ हजार ८६७ श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. धरमपेठ झोनमध्ये ६४ कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली असून, येथे १५ हजार ४१९ मातीच्या तर पीओपीच्या ८४६ अशा एकूण १६ हजार २६५ मूर्तींचे विसर्जन झाले. हनुमाननगर झोनमध्ये ६० कृत्रिम तलाव उभारण्यात आले असून येथे १६ हजार १७ मातीच्या तर ८४६ पीओपीच्या अशा एकूण १६ हजार ६६३ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. धंतोली झोनमध्ये ३१ कृत्रिम तलावांमध्ये ११ हजार ९६७ मातीच्या तर ५२५ पीओपीच्या अशा एकूण १२ हजार ४९२ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. नेहरूनगर झोनमध्ये ६८ कृत्रिम तलावांची व्यवस्था असून येथे १४ हजार ३४४ मातीच्या तर १ हजार १९७ पीओपीच्या अशा एकूण १५ हजार ५४१ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गांधीबाग झोनमध्ये ६८ कृत्रिम तलाव उभारण्यात आले असून येथे २१ हजार ९० मातीच्या आणि १३० पीओपीच्या अशा एकूण २१ हजार २२० मूर्तींचे विसर्जन झाले. सतरंजीपुरा झोनमध्ये २८ कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहे.येथे ११ हजार ६० मातीच्या आणि २ हजार ४२२ पीओपीच्या अशा एकूण १३ हजार ४८२ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. लकडगंज झोनमध्ये ४२ कृत्रिम तलाव उभारण्यात आले असून येथे १५ हजार ६६७ मातीच्या आणि १७८ पीओपीच्या अशा एकूण १५ हजार ८४५ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. आशीनगर झोन मध्ये २५ कृत्रिम तलावामध्ये २ हजार ५३३ मातीच्या आणि ४०३ पीओपीच्या अशा एकूण २ हजार ९३६ मूर्तींचे, तर मंगळवारी झोनमधील ३४ कृत्रिम तलावांमध्ये ५ हजार ५५ मातीच्या आणि १ हजार ८९ पीओपीच्या अश्या एकूण ६ हजार १४४ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. या सोबत पोलीस लाईन टाकळी येथे ३२८ मातीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गोरेवाडा रिंग रोड जलकुंड येथे २२२ मातीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. आणि कोरडी जलकुंड येथे २४० मातीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तसेच सरदार वल्लभभाई पटेल (कच्छीविसा) मैदान येथे १ कृत्रिम जलकुंड उभारण्यात आले असून येथे ७ हजार २४५ मातीच्या आणि १६ पीओपीच्या अशा एकूण ७ हजार २६१ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
तर बाराव्या दिवशी नागपूर शहरात मनपाच्या माध्यमातून उभारलेल्या विविध झोननिहाय कृत्रिम तलाव आणि जलकुंडांच्या सुविधेचा लाभ घेत नागरिकांनी या ४६५ कृत्रिम तलाव आणि जलकुंडांमध्ये १ लक्ष २० हजार ५७२ मातीच्या आणि ७ हजार ३९९ पीओपीच्या अशा एकूण १ लक्ष २७ हजार ९७१ मूर्तीचे विसर्जन केले.
१६३.७५ टन निर्माल्याचे संकलन
श्री गणेश मूर्तींच्या पूजेदरम्यान निर्माण होणाऱ्या निर्माल्याचे मनपाच्या वतीने स्वतंत्रपणे संकलन करण्यात आले. संपूर्ण गणेशोत्सव कालावधीत शहरातून एकूण १६३.७५ टन निर्माल्य संकलित करण्यात आले असून, त्यापासून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. झोननिहाय संकलनात लक्ष्मीनगर १५.६५ टन, धरमपेठ ३.९७ टन, हनुमाननगर १३.९९ टन, धंतोली १६.९ टन, नेहरूनगर १८.८६ टन, गांधीबाग ८.३६ टन, सतरंजीपुरा ९.३९ टन, लकडगंज १७.०२ टन, आशीनगर ५.६ टन आणि मंगळवारी झोनमध्ये २६.५६ टन निर्माल्याचा समावेश आहे.
याशिवाय सरदार वल्लभभाई पटेल (कच्छीविसा) मैदान परिसरातून ६ टन, गोरेवाडा रिंग रोड जलकुंड परिसरातून ४.०८ टन, पोलीस लाईन टाकळी जलकुंड परिसरातून ९.८ टन आणि कोराडी जलकुंड परिसरातून ७ टन निर्माल्य संकलित करण्यात आले.
१ हजार पेक्षा अधिक मनुष्यबळ
शहरातील गणेशोत्सवांनंतर श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक करण्याच्या अनुषंगाने मनपाद्वारे उभारण्यात आलेल्या ४६५ कृत्रिम तलावांच्या स्वच्छतेसाठी, परिसरातील स्वच्छतेसाठी तसेच कृत्रिम तलावांवर मूर्तीच्या विसर्जनाकरिता येणाऱ्या नागरिकांच्या सुयोग्य व्यवस्था आणि सुविधांसाठी मनपाद्वारे मोठ्या संख्येने मनुष्यबळ नेमून देण्यात आले. अकरा दिवसात शहरातील विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या विविध कृत्रिम तलावांवर मनपाने १ हजार ३४ कर्मचारी कर्तव्यावर होते.
स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य
गणपती विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने व्हावे यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी तसेच ग्रीन व्हीजील या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने कार्य सुरू आहे. सातव्या दिवशी मोठ्या संख्येने नागपूर शहरातील नागरिकांनी मनपाच्या या व्यवस्थेचा लाभ घेतला. मनपाचे स्वच्छता ब्रँड ॲम्बेसेडर व ग्रीन व्हीजीलचे श्री. कौस्तुव चॅटर्जी, कु.सुरभी जैस्वाल, श्री.मेहुल कोसुरकर, कु.प्रिया यादव, कु श्रिया जोगी, श्री.तुषार देशमुख यांच्यासह रीफ, रामदेवबाबा विद्यापीठ येथील श्री हार्दिक अग्रवाल, कु.अनुष्का गुरवे, श्री. हर्ष जोरा, श्री. अमेय शेंड्रे, कु. अवंती जोशी यांच्यासह अनेक स्वयंसेवी कार्यकर्ते पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचे अभियान यशस्वीपणे राबवित आहेत..