जन्म व मृत्यू नोंदणी विभागाच्या कामकाजाचा आयुक्तांकडून आढावा
प्रलंबित नोंदणीचे काम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ व रात्रपाळीची ड्युटी लावण्याचे आयुक्तांचे निर्देश
Date : 07 Oct 2026
बैठकीत जन्म व मृत्यू नोंदणी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांना जन्म व मृत्यू नोंदणी तसेच संबंधित दाखले वेळेत उपलब्ध करून देताना येणाऱ्या अडचणी, CRS Portal वरील तांत्रिक अडचणी, प्रलंबित नोंदणी प्रकरणे आणि सन २०१६ पूर्वीच्या अभिलेखांच्या कामकाजाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.
विभागातील प्रलंबित कामाचा निपटारा करून कामाचा भार कमी करण्यासाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासोबतच २४x७ कामकाज तीन पाळ्यांमध्ये राबविण्याचे निर्देश मा. आयुक्तांनी दिले. त्यानुसार सकाळ, दुपार व रात्र अशा तीन पाळ्यांमध्ये कर्मचाऱ्यांची ड्युटी लावून जन्म व मृत्यू नोंदणीचे प्रलंबित काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर करून नोंदणीचे कामकाज वेळेत पूर्ण करावे, तसेच आवश्यकतेनुसार रात्रपाळीमध्येही कर्मचारी नियुक्त करून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करावा, अशा सूचना मा. आयुक्तांनी दिली. यामुळे प्रलंबित कामाचा भार कमी होऊन एका User ID वरून आवश्यक कामकाज सुरळीतपणे करता येईल, याबाबतही नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.
तसेच विभागातील तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्यासाठी संबंधित यंत्रणेशी समन्वय साधावा, प्रलंबित प्रकरणांचा नियमित आढावा घ्यावा आणि नागरिकांना सेवा देताना अनावश्यक विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही निर्देश मा. आयुक्तांनी दिले.
यावेळी मनपाचे मा.आयुक्त डॉ. विपिन, मा.अतिरिक्त आयुक्त (शहर )श्री. अंकीत, मा.अतिरिक्त आयुक्त (सेवा)श्री. मुरूगानंथम, मा.वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा निबंधक (जन्म-मृत्यु) डॉ. दीपक सेलोकर, वैद्यकीय अधिकारी तथा उपनिबंधक (जन्म-मृत्यु) डॉ. गोवर्धन नवखरे, जिल्हा परिषद नागपूरचे मा.जिल्हा माता व बाळ सांगोपण अधिकारी डॉ. रेवती साबळे, सांखिकी अधिकारी श्रीमती. प्रियंका पवार तसेच महानगरपालिकेचे सर्व जन्म-मृत्यु कर्मचारी व झोनल अधिकारी उपस्थित होते.