धम्मचक्र प्रवर्तन दिन समारंभासाठी मनपाची यंत्रणा सज्ज
दीक्षाभूमीतील नागरी सुविधांची आयुक्तांकडून पाहणी
Date : 13 Oct 2026
धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त मनपाच्या वतीने करण्यात येत असलेल्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन यांनी मंगळवार (ता.१३)रोजी दीक्षाभूमी परिसराला भेट दिली. यावेळी नागपूर महानगरपालिका तसेच जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, समाज कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
येत्या 20 ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा होणार आहे. यासाठी विविध राज्यांतून येणार्या अनुयायांसाठी दीक्षाभूमी परिसरात, पीकेव्ही, आयटीआय व कुर्वेज हायस्कूलमध्ये केलेल्या नागरी सुविधांच्या व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. याशिवाय वैद्यकीय व्यवस्था व परिवहन व्यवस्था सुद्धा मनपाद्वारे उपलब्ध केली जाणार आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, अतिरिक्त आयुक्त श्री. मुरुगानंथम, अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, पोलीस उपायुक्त श्री. ऋषीकेश रेड्डी, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. प्रवीण महिरे, मुख्य अभियंता श्रीमती लिना उपाध्ये, उपायुक्त श्री. राजेश भगत, अधीक्षक अभियंता श्री. विजय गुरुबक्षानी, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक श्रीमती सुकेशनी तेलगोटे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता श्री. श्रीकांत वाईकर, सहाय्यक आयुक्त श्री. धनंजय जाधव, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. राजेंद्र उचके, परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी श्री. योगेश लुंगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र राठोड, प्रकल्प अभियंता श्री. राजीव गौतम, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, तसेच झोनल स्वच्छता अधिकारी श्री. ऋषिकेश इंगळे उपस्थित होते.
येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखो बौद्ध अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दीक्षाभूमीवर येणार आहेत. त्यानुसार १८ ऑक्टोंबर ते २१ ऑक्टोंबर या कालावधीमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या वतीने दीक्षाभूमीवर अनुयायांसाठी आवश्यक त्यासर्व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. संपूर्ण दीक्षाभूमी परिसरामध्ये स्वच्छतेला विशेष प्राधान्य देण्याबाबत मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी प्रशासनाला निर्देश दिले.
यावेळी आयुक्त यांनी इतर अधिकाऱ्यांसोबत दीक्षाभूमीचा संपूर्ण परिसर, मुख्य समारंभाचे ठिकाण, डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च येथील इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या जागेत तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था, माता कचेरी सार्वजनिक आरोग्य विभाग परिसर आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय), मध्यवर्ती कारागृह व अन्य नागरी सुविधा या सर्व व्यवस्थेची पाहणी केली. दीक्षाभूमी स्तूप, तसेच सर्व मार्ग आणि शौचालयांच्या ठिकाणी वीज पुरवठा निरंतर सुरू राहील याकडे कटाक्षाने लक्ष देणे तसेच प्रसाधनगृहांमध्ये वीज पुरवठ्यासोबतच निरंतर पाणी पुरवठा देखील ठेवणे आणि सर्व शौचालयांच्या ठिकाणी स्वच्छतेसाठी हँडवॉशची व्यवस्था करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले.
अनुयायांसाठी वॉटर प्रुफ डोमची व्यवस्था
अनुयायांना राहण्यासाठी यावर्षी शहरातील विविध भागांमध्ये नागरी सुविधांसह २१ डोम
उभारण्यात आले आहेत. हे सर्व डोम वॉटर प्रुफ राहणार आहेत. जिल्हा प्रशासन व सामाजिक
न्याय व सहाय्य विभागाच्या मदतीने हे डोम उभारण्यात आले आहेत. यात दीक्षाभूमी
परिसरात ५ डोम राहणार आहेत. याशिवाय या परिसरातील पीकेव्हीचा पदव्युत्तर वसतिगृह
येथे ६ डोमची व्यवस्था राहणार आहे, तसेच कुर्वेज हायस्कूलमध्ये ४ डोममध्ये अनुयायांना
मुक्काम करता येणार आहे. याशिवाय शासकीय आयटीआय भवन, जिल्हा मलेरिया
कार्यालय, उंटखाना, अंबाझरी, बेझनबागमध्ये व ड्रॅगन पॅलेस सुद्धा १-१ डोम उभारण्यात
आलेले आहेत. यात एका डोममध्ये प्रत्येकी १ हजार व्यक्तींच्या निवाऱ्याची व्यवस्था होणार
आहे. यासोबत सामाजिक न्याय व सहाय्य विभाग, विदर्भ वैधानिक विकास महामंडळच्या
इमारतीच्या तळ माळ्यावर अनुयायांची राहण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासन व सामाजिक
न्याय व सहाय्य विभाग द्वारा करण्यात आली आहे.
१२०० स्वच्छता गृहांची उभारणी
ज्या ठिकाणी निवार्यांची व्यवस्था केलेली आहे. त्याच परिसरच्या जवळपास तात्पुरती स्वच्छता गृहे उभारण्यात आली आहेत. परिसरातील विविध भागात १२३५ स्वच्छता गृहे मनपाने उभारली आहेत. प्रत्येक स्वच्छता गृहाच्या ठिकाणी हात पाय धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दरवर्षी होणार्या या कार्यक्रमासाठी कायम स्वरुपाची स्वच्छता गृहांची उभारणी करण्याचा प्रयत्न असल्याचे आयुक्त डॉ. विपीन यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मनपातर्फे याठिकाणी पाणी पुरवठा केला जाणार आहे. या सर्व व्यवस्था आता अंतिम टप्प्यात असून येत्या दोन दिवसात नागरी सुविधांची व्यवस्था पूर्ण होईल, असेही डॉ. विपीन यांनी सांगितले.
पिण्याचे पाण्याची व्यवस्था
क्रिपलानी चौक ते लक्ष्मीनगर चौक, दिक्षभूमी चौक ते काचीपुरा चौक या रस्त्यावर १२० पिण्याचे पाणीचे नळ द्वारा नागपूर महानगरपालिका तर्फे पिण्याचे पाणी अनुयायांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
स्नानगृह
बरेच अनुयायी सकाळी उठून अंबाझरी तलाव कडे स्नान करण्यासाठी जात असतात. अंबाझरी तलावाच्या पायथ्याशी दक्षिण व उत्तर दिशेला तसेच आय टी आय परिसरातील व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परिसरात महिला व पुरुषाकरिता वेगवेगळे ५०-५० स्नानगृह करण्यात येत आहे
अनुयायींसाठी वैद्यकीय पथक
काचीपुरा पोलीस चौकीसह इतर ठिकाणी मनपाचे आरोग्य सेवा पथक उपलब्ध राहणार आहे. त्याचप्रमाणे मनपातर्फे संचालित आपली बसच्या व्यवस्थेबद्दलची माहिती अनुयायांना काचीपुरा पोलीस चौकीजवळ उपलब्ध होणार आहे. दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस पर्यंत मनपातर्फे बस सेवा उपलब्ध राहणार आहे.
याशिवाय अनुयायांसाठी मनपाच्या शाळा सुद्धा खुल्या राहणार आहेत. मनपातर्फे २४ तास वैद्यकीय सेवा पुरविण्यात येणार आहे. याशिवाय या परिसराची स्वच्छता राखण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत २४ तास सफाई कामगार तैनात केले जाणार आहेत.