ओंकार नगर चौकातील रस्त्यावरील खड्ड्याची समस्या २४ तासांत निकाली
स्थायी समिती अध्यक्षा शिवानी दाणी वखरे यांच्या पुढाकारातून प्रशासनाची तातडीने कार्यवाही
Date : 15 Oct 2026
ओंकार नगर चौक हा नागरिकांच्या नियमित वर्दळीचा परिसर असल्याने रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः वाहतुकीच्या ठिकाणी अशा प्रकारचे खड्डे अपघातांना निमंत्रण देऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन स्थायी समिती अध्यक्षा शिवानी दाणी वखरे यांनी संबंधित समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर महापालिकेच्या संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करीत खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण केले.
नागरिकांच्या दैनंदिन अडचणींची दखल घेऊन त्यांचे वेळेत निराकरण करणे, हा नागपूर महानगरपालिकेच्या कामकाजातील महत्त्वाचा भाग आहे. रस्त्यांवरील खड्डे, स्वच्छता आणि नागरी सुविधांशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागांनी तत्परतेने कार्यवाही करावी, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
ओंकार नगर चौकातील खड्ड्याची समस्या अल्पावधीत सोडविण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शहरातील नागरिकांनी रस्त्यांवरील खड्डे किंवा अन्य नागरी समस्यांची माहिती महापालिकेच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.