मनपाद्वारे अनुयायांसाठी 1 हजार 235 पेक्षा अधिक प्रसाधनगृह
दीक्षाभूमीवरील मनपाच्या नागरी सुविधा अंतिम टप्प्यात
Date : 15 Oct 2026
रविवार 18 ऑक्टोबरपासून नागरी सुविधा अनुयायांसाठी उपलब्ध होणार असून, धम्मचक्र प्रवर्तन दिन मुख्य समारंभ आणि इतर दिवशी देखील दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्ध अनुयायांची सुविधा, सुरक्षा आणि आरोग्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा पूर्णत: सज्ज झालेली आहे. मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेऊन घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, अग्निशमन व कायदा सुव्यवस्था चांगली राहील, या चार प्रमुख बाबींवर अधिकारी व कर्मचार्यांनी विशेष लक्ष द्यावे तसेच मुलभूत सुविधांमध्ये त्रुटी राहू नयेत याची काळजी घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. विशेष म्हणजे, मुलभूत सुविधांमध्ये महिला आणि पुरूषांसाठी 1 हजार 235 अधिक स्वतंत्र शौचालयांची व्यवस्था आयटीआय परिसर, आरोग्य उपसंचालक कार्यालय (माता कचेरी) आणि कारागृहाच्या जागेमध्ये करण्यात आलेली आहे. तर पुरुष आणि महिलांकरीता प्रत्येकी २५ असे एकूण ५० स्नानगृहाची व्यवस्था आयटीआय परिसरामध्ये करण्यात आली आहे.
येत्या 20 ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तनाचा मुख्य समारंभ होणार आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्ध अनुयायांच्या संख्या लक्षात घेता येत्या 18 ते 21 ऑक्टोबर या कालावधीमध्ये नागपूर महानगरपालिका द्वारा दीक्षाभूमीवर अनुयायांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दीक्षाभूमीवर येणाऱ्या मार्गांवर चार ठिकाणी मनपाचे आरोग्य तपासणी केंद्र, २४ तास रुग्णवाहिका, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था, स्वच्छतेसाठी एक हजारच्या वर सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मदतीसाठी साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ नियंत्रण कक्ष, अग्निशमन पथक, शौचालयांची व्यवस्था, निवारा व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, परिवहन व्यवस्था, अग्निशमन पथक आदी सर्व सुविधा मनपाद्वारे दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्ध अनुयायांसाठी करण्यात आलेल्या आहे.
मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्या निर्देशानुसार, मनपाची संपूर्ण व्यवस्थेची योग्य पद्धतीने अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व व्यवस्थांच्या संदर्भात अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. संपूर्ण देशातून दीक्षाभूमीवर लाखो बौद्ध अनुयायी येतात. या सर्वांना कोणत्याही प्रकारच्या मुलभूत सुविधांसाठी त्रास सहन करावा लागू नये, यासाठी मनपाद्वारे संपूर्ण यंत्रणा सुविधापूर्णक व्यवस्थेची हाताळणी करीत आहे. दीक्षाभूमीकडे येणाऱ्या मार्गांवर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. याशिवाय बाहेरून येणाऱ्या अनुयायांना दीक्षाभूमीवर येण्यासाठी किंवा कामठी येथील ड्रॅगन पॅलेसला जाण्यासाठी मनपाच्या परिवहन विभागाद्वारे विशेष ‘आपली बस’ ची व्यवस्था करण्यात आली आहे. काछीपुरा चौकामध्ये ‘आपली बस’चे बस स्थानक देखील उभारण्यात येणार आहे.
प्रत्येक निवार्यात अग्निशमन व्यवस्था
अनुयायांसाठी उभारण्यात येणाऱ्या निवारा केंद्रामध्ये अग्निशमन विभागातर्फे आग विझविण्याची व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाणी व्यवस्था केली आहे.
मनपाचा नियंत्रण कक्ष
नागरिकांना आवश्यक सुविधा आणि त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक शेजारी मनपाचे नियंत्रण कक्ष उभारण्यात येत असून हे कक्ष २४ तास कार्यरत असणार आहे. यासाठी आयुक्तांद्वारे अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. या ठिकाणी अँम्बुलन्स ची व्यवस्था राहणार आहे.
अंबाझरी तलावावर वर जीवन रक्षा दल
अंबाझरी तलावावर स्नान करण्यासाठी अनेक अनुयायी येत असतात. यावेळी एखादी अप्रिय घटना घडल्यास अग्निशमन दलाचे जवान उपलब्ध राहणार आहे. जीवन रक्षा बोट उपलब्ध राहणार आहे. त्याचप्रमाणे एनडीआरएफ व एसडीआरएफचे जवानांची सेवा उपलब्ध राहणार आहे.
दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस पर्यंत बस सेवा
दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांना कामठी येथील ड्रॅगन पॅलेस पर्यंत जाण्यासाठी मनपाच्या परिवहन विभागाने आपली बसची व्यवस्था केली आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत ही बससेवा सुरु राहणार आहे. त्याचप्रमाणे बस स्थानक, रेल्वे स्टेशन, अजनी रेल्वे स्टेशन, मोरभवन, एमपी स्टँड जाण्यासाठी बसची व्यवस्था राहणार आहे. बस व्यवस्थेची माहिती एलईडी स्क्रीन द्वारे दिली जाणार आहे.