राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारी युनिटी मॅरेथॉन रन
Date : 30 Oct 2026
नागरिकांच्या या स्पर्धेतील सहभागातून राष्ट्रीय एकतेचा संदेश देणे हा यामागील उद्देश असून, मोठ्या संख्येने नागरिकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा, तसेच राष्ट्रीय एकतेच्या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी केले आहे.
पत्रकार परिषद प्रसंगी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्ता पक्ष नेते श्री नरेंद्र बाल्या बोरकर, परिवहन समिती सभापती श्रीमती मंगला खेकरे, क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड, नगरसेवक श्री दिलीप दिवे, श्री.विनोद कन्हेरे, श्रीकांत आगलावे, डॉ. पीयूष आंबुलकर उपस्थित होते.
‘युनिटी रन मॅरेथॉन’ स्पर्धेत २१. कि.मी.(खुला), १० कि.मी. पुरुष व महिला खुला गट, ५.३ कि.मी. महिला खुला गट, ५.३ कि.मी. १६ वर्षांखालील मुले, २.५ कि.मी. १६ वर्षांखालील मुली तसेच सर्वांसाठी २.३ कि.मी. ची असणार आहे. विशेष म्हणजे, स्पर्धेतील सहभागी धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आकर्षक पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. यात एकूण ११ लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार असून, वेशभूषा स्पर्धा (फॅन्सी ड्रेस) सहभागींसाठी आकर्षक बक्षिसे, प्रथम ५ हजार धावपटूंना पदके आणि सर्व नोंदणीकृत धावपटूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने आयोजित या ‘युनिटी मॅरेथॉन’मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. धावण्याच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देतानाच राष्ट्रीय एकता, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याची भावना अधिक दृढ करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. कुटुंबीय, मित्रमंडळी तसेच विविध संस्था व संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून ‘युनिटी मॅरेथॉन’ला यशस्वी करावे, असे आवाहन सत्तापक्ष नेते तथा कार्यक्रमाचे संयोजक श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर केले आहे.
युनिटी मॅरेथॉन रन स्पर्धेला महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री श्री, नितीन गडकरी उपस्थित राहणार असून, त्यांच्या शुभहस्ते हिरवी झेंडी दाखवून मॅरेथॉनला सुरुवात करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. महापौर श्रीमती निता ठाकरे राहणार असून, या कार्यक्रमाला केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री मा. श्रीमती रक्षा खडसे, विशेष अतिथी म्हणून राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री, श्री. चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड. आशिष जैस्वाल, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यसभा सदस्य मा. श्रीमती माया इवनाते, विधान परिषद आमदार सर्वश्री अभिजीत वंजारी, सुधाकर अडबाले, डॉ. परिणय फुके, कृपाल तुमाने, संजय भेंडे, डॉ. राजीव पोतदार, विधान सभा सदस्य आमदार सर्वश्री. डॉ. नितीन राऊत, कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, मोहन मते, विकास ठाकरे, यांची उपस्थिती राहणार आहेत. तसेच विशेष मान्यवर म्हणून, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते तथा युनिटी मॅरेथॉन रनचे संयोजक श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्ष नेते श्री. संजय महाकाळकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, अतिरिक्त आयुक्त श्री. मुरुगानंथम एम., अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड, शिक्षण विशेष समिती सभापती श्रीमती संतोष लड्ढा, लकडगंज झोन सभापती श्रीमती महेश्वरी बिसेन, एआयएमआयएमचे गटनेता श्री. शकील पटेल, इंडिअन मुस्लिम लीगचे गटनेता श्री. असलम खान मुल्ला, शिवसेना(उबाठा)चे गटनेता श्री. किशोर कुमेरिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) गटनेता श्रीमती आभा पांडे, बहुजन समाज पार्टीच्या गटनेता श्रीमती हर्षला जैस्वाल, शिवसेनाचे गटनेता श्री. गणेश चार्लेवार, स्थानिक नगरसेवक श्री. बालू लारोकर, नगरसेविका श्रीमती अर्चना पडोळे, नगरसेवक श्री. अतुल कोटेचा यांची उपस्थिती राहणार आहे.
संकेत स्थळाच्या माध्यमातून नोंदणी
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने 'युनिटी मॅरेथॉन' मध्ये सहभागी सर्व खेळाडू आणि नागरिकांसाठी एक संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे, या संकेत स्थळाच्या मदतीने मोठ्या संख्येत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असल्याची माहिती उपायुक्त श्री. मंजेश खवले व क्रीडा अधिकारी डॉ.पियुष अंबुलकर यांनी दिली.
११ लाख रुपयांची पारितोषिके
‘युनिटी मॅरेथॉन’ रन मध्ये विजयी होणाऱ्या खेळाडूंसाठी एकूण ११ लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. विविध वयोगटांनुसार ही पारितोषिके विभागण्यात आली असून, प्रत्येक गटातील पहिल्या दहा क्रमांकाच्या धावपटूंना पदक, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडू व नागरिकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
१६ वर्षांखालील मुली – २.५ कि.मी.
या गटातील मॅरेथॉनची सुरुवात कच्छीविसा मैदान येथून होऊन सतनामी नगर चौकापासून उजवीकडे मार्गक्रमण करत आंबेडकर चौक, वर्धमान नगर, एम.एस.ई.बी. ऑफिस, सुदर्शन चौक करत पुन्हा सतनामी नगरमार्गे कच्छीविसा मैदान येथे समाप्ती होईल.
पारितोषिके : प्रथम पुरस्कार रुपये १५,०००/-, द्वितीय पुरस्कार रुपये ११,०००/-, तृतीय पुरस्कार रुपये ९,०००/-, चौथ्या क्रमांकासाठी ७,०००/-, पाचव्या, सहाव्या, सातव्या, आठव्या, नवव्या आणि दहाव्या क्रमांकावरील खेळाडूंना ५,०००/- रुपयांचे पुरस्कार मिळणार आहेत.
१६ वर्षांखालील मुले – ५.३ कि.मी.
या गटाची सुरुवात कच्छीविसा मैदान येथून होऊन सतनामी नगर चौकापासून उजवीकडे मार्गक्रमण करत आंबेडकर चौक, वर्धमान नगर, एम.एस.ई.बी. ऑफिस, सुदर्शन चौक, हरिहर मंदिर, लकडगंज पोलीस स्टेशन, सतरंजीपूरा, क्वेटा कॉलोनी, टेलिफोन एक्सचेंज चौक, छाप्रूनगर चौक, आंबेडकर चौक, सतनामी नगरमार्गे कच्छीविसा मैदान येथे समाप्ती होईल.
पारितोषिके: प्रथम पुरस्कार रुपये १५,०००/-, द्वितीय पुरस्कार रुपये ११,०००/-, तृतीय पुरस्कार रुपये ९,०००/-, चौथ्या क्रमांकासाठी ७,०००/-, पाचव्या, सहाव्या, सातव्या, आठव्या, नवव्या आणि दहाव्या क्रमांकावरील खेळाडूंना ५,०००/- रुपयांचे पुरस्कार मिळणार आहेत.
ओपन महिला गट – ५.३ कि.मी.
या गटाची सुरुवात कच्छीविसा मैदान येथून होऊन सतनामी नगर चौक, आंबेडकर चौक, वर्धमान नगर, एम.एस.ई.बी. ऑफिस, सुदर्शन चौक, हरिहर मंदिर, लकडगंज पोलीस स्टेशन, सतरंजीपूरा, क्वेटा कॉलोनी, टेलिफोन एक्सचेंज चौक, छाप्रूनगर चौक, आंबेडकर चौक, सतनामी नगरमार्गे कच्छीविसा मैदान येथे समाप्ती होईल.
पारितोषिके : प्रथम पुरस्कार रुपये २१,०००/-, द्वितीय पुरस्कार रुपये १५,०००/-, तृतीय पुरस्कार रुपये ११,०००/-, चौथ्या क्रमांकासाठी ९,०००/-, पाचव्या क्रमांकावर ७,०००/-, सहाव्या, सातव्या, आठव्या, नवव्या आणि दहाव्या क्रमांकावरील खेळाडूंना ५,०००/- रुपयांचे पुरस्कार मिळणार आहेत.
ओपन पुरुष आणि महिला गट – १० कि.मी.
या गटाची सुरुवात कच्छीविसा मैदान येथून होऊन सतनामी नगर चौकापासून उजवीकडे मार्गक्रमण करत आंबेडकर चौक, शास्त्रीनगर चौक, वैष्णवदेवी चौक, सात वाचन लॉन, एम.एस.ई.बी. ऑफिस, सुदर्शन चौक, हरिहर मंदिर, लकडगंज पोलीस स्टेशन, सतरंजीपूरा, क्वेटा कॉलोनी, टेलिफोन एक्सचेंज चौक, आजमशाह चौक, दारोडकर चौक, गांधी पुतळा चौक, बडकस चौक, लाकडी पूल, नवाबपुरा, शिवाजी नगर, गंगाबाई घाट चौक मार्गे कच्छीविसा मैदान येथे समाप्ती होईल.
पारितोषिके : प्रथम पुरस्कार रुपये ५१,०००/-, द्वितीय पुरस्कार रुपये ३१,०००/-, तृतीय पुरस्कार रुपये २१,०००/-, चौथ्या क्रमांकासाठी १५,०००/-, पाचव्या क्रमांकावर ११,०००/, सहाव्या, सातव्या, आठव्या, नवव्या आणि दहाव्या क्रमांकावरील खेळाडूंना ५,०००/- रुपयांचे पुरस्कार मिळणार आहेत.
ओपन पुरुष/महिला गट – २१ कि.मी.
प्रथम पुरस्कार रुपये १,००,०००/-, द्वितीय पुरस्कार रुपये ७०,०००/-, तृतीय पुरस्कार रुपये ५०,०००/-, चौथ्या क्रमांकासाठी ४०,०००/-, पाचव्या क्रमांकावर ३०,०००/-, सहाव्या क्रमांकावर २०,०००/-, सातव्या, आठव्या, नवव्या आणि दहाव्या क्रमांकावरील खेळाडूंना ११,०००/- रुपयांचे पुरस्कार मिळणार आहेत.
टी-शर्ट चे वाटप
‘युनिटी मॅरेथॉन’मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडू आणि नागरिकांना महानगरपालिकेच्या वतीने ‘युनिटी मॅरेथॉन’चे टी-शर्ट वितरित करण्यात येणार आहेत. शुक्रवारी (ता.३०) रोजी सरदार वल्लभभाई पटेल कच्छी विसा मैदान, लकडगंज येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत टी-शर्ट्सचे वाटप केले जाणार आहे. सर्व सहभागी खेळाडूंना आणि नागरिकांना संकेत स्थळावर नोंदणी केल्यानंतर मिळणाऱ्या क्युआर कोडच्या मदतीने टी-शर्ट्सचे वाटप केले जाणार आहे, त्यामुळे सर्व सहभागी नागरिकांनी आणि स्पर्धकांनी टी-शर्ट्स घ्यायला जातांना नोंदणीवेळी मिळालेला क्यूआर कोड सोबत ठेवावा.