नागपूर व लगतच्या शहरांसाठी 1300 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना
कन्हान- कोलार बॅरेज बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश व्यावसायिक पाणी वापरावर मर्यादा घाला
Date : 31 Oct 2026
नागपूर शहराच्या पाणी टंचाईच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियोजन भवनात आज (ता. 31) वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेतली व उपाययोजनांचा आढावा घेतला. या बैठकीला अर्थ व नियोजन राज्यमंत्री श्री. आशीष जयस्वाल, महापौर श्रीमती निता ठाकरे, खासदार श्रीमती मायाताई इवनाते, आमदार श्री. राजीव पोद्दार, आमदार श्री. संजय भेंडे, आमदार श्री. कृष्णा खोपडे, आमदार श्री. प्रवीण दटके, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, आयुक्त डॉ. विपीन, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्री. संजय मिना, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, एनएमआरडीएच्या श्रीमती सुप्रिया थूल, जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता श्रीमती सोनाली चोपडे, कार्यकारी अभियंता श्री. राजेश दुफारे, कार्यकारी अभियंता श्री. श्रीकांत वाईकर उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी आयुक्त डॉ. विपीन यांनी शहरातील पाणी बचत व जलसंवर्धन मोहिम 2026 बद्दलची माहितीचे पीपीटीद्वारे सादरीकरण केले. यात पाण्याची गळती शोधून काढण्यासाठी त्वरित उपाययोजना करून गळतीचे प्रमाण कमी करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कार वॉशिंग करण्यासाठी मनपाच्या नळाच्या वापर करणार्यांचे कनेक्शन कापण्याची कारवाई केल्याचे यावेळी आयुक्तांनी सांगितले.
शहरातील विहिरीचा अधिकाधिक वापर करण्यासाठी विहिरींवर लघु पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात येणार आहे. शहरात एकूण 860 सार्वजनिक विहिरी आहेत. यावर मेडाच्या मदतीने सौर दुहेरी जलपंपिंग प्रणाली 400 विहिरींवर बसविण्यात येणार आहे. यावर अनुमानित खर्च 16 कोटी रुपये एवढा आहे. यातून प्रतिदिन 20 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा शहराला होईल, असेही डॉ. विपीन यांनी यावेळी सांगितले.
सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी शहरात 10 सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) मधे हायड्रंट लावून टँकर द्वारा पाणी पुरवठा शहरातील उद्याने, रस्त्यावरील झाडे साठी करण्यात येणार आहे.
शहरातील 293 वॉशिंग सेंटरचे सर्वेक्षण मनपाने केले आहे. यामध्ये ७५ नळाच्या पाण्याचा वापर करणार्यां केंद्रांवर नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या केंद्रांना पिण्याच्या पाण्याशिवाय इतर स्त्रोतातून पाण्याचा वापरासाठी करण्याची सूचना दिली आहे, अशी माहिती यावेळी आयुक्तांनी दिली.
नागपूर शहर व लगतच्या शहराची वाढती पाण्याची मागणी लक्षात घेऊन भविष्यात नागपूरला पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी नवी शाश्वत पाणी पुरवठा योजना आवश्यक असल्याचे मत पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी व्यक्त केले. यावेळी कन्हान-कोलार नदीवर बॅरेज बांधण्याची योजना पुन्हा प्रस्तावित करण्याचे निर्देश यावेळी दिले. यामुळे शहराला 100 टक्के शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध राहील. यासाठी 900 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या संदर्भात मनपा व जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांनी मिळून तात्काळ एक प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवावे, या प्र्स्तावाला राज्य मंत्रीमंडळातून मंजुरी घेऊन कायम स्वरुपी पाणी टंचाईतून मुक्तता करण्यात या योजनेचा लाभ मिळेल.
त्याचप्रमाणे नागपूर लगतच्या शहरांना पाणी पुरवठा करण्यासाठी एनएमआरडीएतर्फे 400 कोटी रुपयांची योजना प्र्स्तावित केली आहे. पेंच धरणामध्ये नागपूर मनपाच्या हक्काचे 35 एम एम क्यूब पाणी शिल्लक राहिले आहे. या पाण्याचा वापर करून एनएमआरडीएनतर्फे ही योजना प्र्स्तावित करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले.
व्यावसायिक वापरासाठी मर्यादा घाला – श्री. बावनकुळे
यावेळी पाऊस कमी झाल्याने दुष्काळाची स्थिती आहे. या काळात पाण्याचा वापर जपून करावा. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली लावण्यासाठी सक्ती करावी, असे निर्देश पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे व्यावसायिक कामासाठी पाणी वापरावर मर्यादा घालावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.