शहराच्या विकास प्रकल्पांचा महापौरांकडून आढावा
प्रकल्प त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश
Date : 04 Nov 2026
शहरातील विकास प्रकल्पांच्या स्थितीची माहिती महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांकडून आज (ता. 4) डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात पार पडलेल्या बैठकीत घेतली. यावेळी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, आयुक्त डॉ. विपीन यांच्यासह अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती श्रीमती मनीषा अतकरे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी श्री. सदाशिव शेळके, मुख्य अभियंता श्रीमती लिना उपाध्ये, अधीक्षक अभियंता श्री. नरेश बोरकर, श्री. विजय गुरुबक्षानी, उपायुक्त श्री. राजेश भगत, उपायुक्त श्री. गणेश राठोड, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, शिक्षणाधिकारी श्री. अमित भदाणे, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. राजेंद्र उचके यांच्यासह सर्व विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
टाऊन हॉलच्या बांधकामाला गती
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात काही प्रकल्पांचे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने तयारीला वेग देण्याचे निर्देश महापौर श्रीमती ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिले. मनपाच्या महाल भागात उभारण्यात येत असलेल्या राजे रघुजी नगर भवनाच्या (टाऊन हॉल) बांधकामाचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. उर्वरित कामे त्वरित पूर्ण करून हिवाळी अधिवेशनाच्या काळात या टाऊन हॉलचे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने कामाला वेग द्यावे, असे निर्देश महापौरांनी यावेळी दिले.
मिनीमातानगर भागातील प्रस्तावित हॉस्पिटल तसेच क्वेटा कॉलनीतील देवडीया हॉस्पीटलचे कामे पूर्णत्वात जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नरेंद्रनगरात फूड कोर्ट उभारणे तसेच वर्धा मार्गावरील प्राईड हॉटेल समोरील रा. स्व. संघाचे प्रथम सरसंघचालक डॉ. हेडगेवार चौकाचे सौंदर्यीकरण करून तेथे फाऊंटेन उभारण्याच्या काम पूर्ण करण्याचा आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे भांडेवाडी भागातील फिश मार्केटचे बांधकाम डिसेंबर महिन्यात पूर्ण होणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.
भांडेवाडी परिसरात उभारण्यात येत असलेल्या मोकाट श्वानासाठी उभारण्यात येत असलेल्या डॉग शेल्टरचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे, जखमी व आजारी श्वानांवर उपचार करून त्यांना सोडून देणे यासाठी हे डॉग शेल्टरमध्ये होणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मनपाचे मुख्य द्वार त्वरित पूर्ण करा- बोरकर
मनपाच्या मुख्यालयातील मुख्य प्रवेशद्वाराचे काम त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी दिले. हिवाळी अधिवेशन असल्याने त्यापूर्वी मनपाचे मुख्य प्रवेश द्वार सुरू होणे आवश्यक असल्याचे श्री. बोरकर यांनी सांगितले.
वर्किंग वुमन होस्टेल
जयताळा परिसरात उभारण्यात येत असलेल्या वर्किंग वुमन होस्टेलचे काम अंतिम टप्प्यात असून हे काही महिन्यातच पूर्ण होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी शहरात होणार्या लकडगंज, केटीनगर, जुना बगडगंज व गंजीपेठ येथील अग्निशमन केंद्रांच्या कामचाही आढावा घेण्यात आला. उंच इमारतीला लागलेली आग विझविण्यासाठी सक्षम यंत्रसामुग्री खरेदी करण्याचे प्रस्तावावर यावेळी चर्चा करण्यात आली.
जिजाऊ सेंटरचे बांधकाम पूर्ण करा
शंकरनगरात स्वयंसहायता बचत गटाच्या महिलांसाठी उभारण्यात येत असलेले जिजाऊ सेंटरचे बांधकामाचा आढावा यावेळी घेण्यात आला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी या सेंटरचा उपयोग होणार आहे.
अधिकारी व कर्मचार्यांमध्ये संवाद हवा
विकास कामे करताना अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे, असे महापौर श्रीमती ठाकरे यांनी सांगितले. त्यांनी प्रकल्पांच्या कामामध्ये होणाऱ्या विलंबावर आपली नाराजी व्यक्त केली. तसेच प्रकल्पाचे लोकार्पण होण्याकरिता सर्व विभागाचे एनओसी प्राप्त करून घेण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले.