नदी-नाले सफाईसह मार्ग स्वच्छताच्या व्यवस्थेला अत्याधुनिक यंत्रसामग्रीचे बळ
महापौर यांच्या हस्ते १२ रोड स्वीपिंग अन् ४ चेन क्रॉलर एक्स्कॅव्हेटर मशीनचे लोकार्पण
Date : 06 Nov 2026
यावेळी आमदार श्री कृष्णा खोपडे, आयुक्त डॉ. विपिन, उपमहापौर श्रीमती लीला हाथीबेड, सत्तापक्ष नेते श्री नरेंद्र (बाल्या) बोरकर विरोधी पक्षनेते श्री. संजय महाकाळकर, आरोग्य सेवा समितीच्या सभापती श्रीमती मनिषा अतकरे, झोन सभापती श्रीमती महेश्वरी बेसेन, नगरसेविका श्रीमती सुजाता कोंबडे, श्रीमती भावना लोणारे, श्रीमती मंगला मस्के, ज्येष्ठ नगरसेवक श्री संदीप गवई, श्री. श्रीकांत आगलावे, श्री. मनोज साबळे, श्री. प्रमोद ठाकूर, श्री. सुहास मानवटकर, उपायुक्त श्री राजेश भगत, सहाय्यक आयुक्त श्री प्रमोद वानखेडे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, स्वच्छता निरीक्षक श्री लोकेश बासनवर आणि श्री सुरेश खरे यांच्यासह जेसीबीचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी महापौर निता ठाकरे यांनी शहर स्वच्छतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला. या यंत्रसामग्रीवर काम करणाऱ्या मनुष्यबळाला योग्य आणि आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावे. अशा सूचना त्यांनी यावेळी दिली.
केंद्र व राज्य शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 अंतर्गत नागपूर महानगरपालिकेला १२ रोड स्वीपिंग मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मशीनची खरेदी अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (2.0) यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या १२ मशीनसाठी एकूण ५.५८ कोटींचा रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून, प्रत्येक मशीनची किंमत ४६.५० लाख रुपये इतकी आहे. या रोड स्वीपिंग मशीनची क्षमता ३ क्यूबिक मीटर इतकी आहे. या मशीनची निर्मिती बॅक्सी लिमिटेड या कंपनीद्वारे करण्यात आली असून, त्यासाठी टाटा मोटर्सचे चेसिस वापरण्यात आले आहे. या आधुनिक मशीनच्या माध्यमातून शहरातील प्रमुख आणि महत्त्वाच्या रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने अधिक जलद व प्रभावी साफसफाई करणे शक्य होणार आहे. रस्त्यांवरील धूळ, माती आणि कचरा काढण्यासाठी या मशीनचा उपयोग होणार असून, शहराच्या स्वच्छतेच्या दर्जात सुधारणा होण्यास मदत होणार आहे.