मनपाच्या स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी उपक्रमाला चांगला प्रतिसाद
पाच दिवसात साडेपाच हजार किलो निरुपयोगी वस्तूंचे संकलन
Date : 09 Nov 2026
दीपावलीनिमित्त नागरिक घराची साफसफाई करतात. यावेळी अनेक निरुपयोगी वस्तू घरा बाहेर येतात. या वस्तूंची विल्हेवाट कशी लावायची, हा प्रश्न नागरिकांपुढे राहतो. या वस्तूंची विल्हेवाट लावताना नागरिकांना कोणतीही अडचणी येऊ नये, यासाठी महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर व आयुक्त डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनात निरुपयोगी वस्तू संकलन करण्याचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला.
गेल्या 2 नोव्हेंबरला महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी या उपक्रमाचे मनपाच्या मुख्यालयातील संकलन केंद्राचे उद्घाटन केले. हे अभियान 2 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबरपर्यंत राबविण्यात आले. प्रत्येक झोनमध्ये तसेच इतरही काही ठिकाणी जवळपास 80 वर संकलन केंद्रे सुरू केली होती. पाच दिवस चाललेल्या या उपक्रमाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. मनपाचे उपायुक्त श्री. राजेश भगत व मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या नेतृत्वात आयसीई पथकाने ही मोहीम राबविली.
स्वयंसेवी संस्थांना वस्तूंचे वाटप
या मोहिमत प्रामुख्याने कपडे, प्लास्टिक, पेपर, पुस्तके, ई-वेस्ट, भांडी व लाकडांची सामान जमा करण्यात आली. यात सर्वाधिक 3 हजार किलो कपडे जमा झाले. प्लास्टिक 1353 किलो, पेपर व पुस्तके 191 किलो तर ई-वेस्ट 39 किलो जमा झाला. जमा झालेल्या निरुपयोगी वस्तूंची उपयोगात आणणार्या संस्थांना या वस्तू दिल्या जातात. जुन्या कापडापासून पिशव्या तयार करणार्या स्वयंसेवी संस्तांना जुने कपड्यांचे वाटप केले जाते. कचर्यातून कला साकारणार्या स्वयंसेवी संस्थांशी संवाद साधून या निरुपयोगी वस्तूंची विल्हेवाट लावली जाते. वर्तमानपत्रांच्या पेपरपासून पिशव्या तयार करणार्यांना पेपरची रद्दी दिली जाते. तसेच ईवेस्टचा वापर करणार्या संस्थांना या वस्तू दिल्या जातात. या संस्था या वस्तूंवर प्रक्रिया करून पुन्हा वापरात आणतात.