सुरेल स्वरांनी रंगली संगीत संध्या पवनदीप राजन-चेतना भारद्वाज यांच्या मैफिलीने रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध
मनपाच्या गरोबा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Date : 14 Nov 2026
कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी, आमदार श्री.राजीव पोतदार, आमदार श्री. संजय भेंडे, आमदार श्री कृष्णा खोपडे, कार्यक्रमाचे संयोजक तथा सत्तापक्ष नेते श्री.नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी महापौर श्री दयाशंकर तिवारी, उपमहापौर श्रीमती लीला हाथीबेड, अतिरिक्त आयुक्त श्री.मिलिंद मेश्राम, क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड, शिक्षण विशेष समिती सभापती श्रीमती संतोषदेवी लड्ढा, झोन सभापती श्रीमती तारा यादव, श्रीमती धनश्री देशपांडे, श्रीमती महेश्वरी बिसेन यांच्यासह स्थानिक नगरसेवक श्री. बालू रारोकर, नगरसेविका श्रीमती अर्चना पडोळे, नगरसेवक श्री. अतुल कोटेचा, कर आकारणी समिती सभापती श्रीमती सरिता कावरे, झोन समिती सभापती श्रीमती ज्योती देवघरे, श्रीमती उमा देशमुख, श्रीमती सीमा ढोमणे, श्रीमती अभिरुची राजगिरे, नगरसेविका श्रीमती वैशाली उदापूरकर, श्रीमती अर्चना पडोळे, श्रीमती शारदा बारई, श्रीमती शीतल रारोकर, नगरसेवक सर्वश्री. राजेश्वर दिवटे , सुनील हिरणवार, संजय अवचट,दीपक वाडीभस्मे यांच्यासह इतर नगरसेवक मनपाचे उपायुक्त श्री मंगेश खवले, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर, कार्यकारी अभियंता श्री. सुनील गजभिये यांच्यासह मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार श्री राजीव पोतदार यांनी संगीत संध्या कार्यक्रमांच्या आयोजनामुळे नागरिकांच्या मनात चेतना उत्साह निर्माण होत असल्याचे सांगितले. तसेच महानगरपालिका नागरिकांना नागरी सुविधा उत्तमरीत्या पुरवित असल्याचे सांगत त्यांनी मनपाच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजक तथा सत्तापक्ष नेते श्री.नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी केले. त्यांनी आपण गत वीस वर्षापासून नागरिकांकडून मिळालेल्या बळाच्या जोरावर उत्तम काम करीत असल्याचे सांगितले.
केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गायक पवनदीप राजन आणि गायिका चेतना भारद्वाज यांचे स्वागत केले.
गुलाबी थंडीत सायंकाळचे वातावरण संगीताच्या सुरांनी भारून गेले. कार्यक्रमाची सुरुवात चेतना भारद्वाज यांच्या जादुई आवाजाने झाली. ‘मैं कमली, कमली...’ हे लोकप्रिय गीत सादर करताच संपूर्ण मैदान सुरेल वातावरणाने भारून गेले. त्यानंतर ‘तू मेरे जानिया...’, ‘मैं तेनू समझावां...’ आणि ‘सैयारा... तू पास है जैसे...’ यांसारख्या गीतांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
चेतना यांच्या भावस्पर्शी आणि मधुर आवाजाने कार्यक्रमाला एक वेगळीच उंची मिळाली. ‘लग जा गले...’ हे अजरामर गीत सुरू होताच उपस्थित रसिकांनीही स्वरात स्वर मिसळला. त्यानंतर ‘ये दिल तुम बिन लगता नहीं...’ या गीताच्या सादरीकरणावेळी एक अनोखा नजारा पाहायला मिळाला. हजारो रसिकांनी आपल्या मोबाईलची टॉर्च सुरू करताच संपूर्ण मैदान प्रकाशाच्या असंख्य झगमगत्या किरणांनी उजळून निघाले. क्षणभर संपूर्ण परिसर एखाद्या तारकांनी भरलेल्या आकाशासारखा भासत होता.
त्यानंतर पवनदीप राजन यांच्या दमदार आणि वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने संगीत संध्येची रंगत आणखी वाढली. ‘जो तुम ना हो...’, ‘कैसे हुआ... तू इतना जरूरी कैसे हुआ...’ यांसारखी लोकप्रिय गीते सादर करत त्यांनी रसिकांची मने जिंकली. त्यांच्या प्रत्येक गीताला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.
सैराट झालं जी...’.
मात्र, कार्यक्रमातील सर्वाधिक आकर्षण ठरले ते लोकप्रिय मराठी गीत ‘सैराट झालं जी...’. हे गीत सादर होताच संपूर्ण मैदानात एकच जल्लोष झाला. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे वातावरण अक्षरशः भारून गेले. अनेक रसिकांनी गीताच्या ठेक्यावर ताल धरत कलाकारांना भरभरून दाद दिली. ‘आज मौसम बड़ा बेईमान है...’ या गीतानेही रसिकांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. एकामागोमाग एक लोकप्रिय आणि भावस्पर्शी गीतांची बहार सुरू असताना कलाकार आणि रसिक यांच्यातील सुरेल संवाद अधिकाधिक रंगत गेला. पवनदीप राजन यांनी गीत गायले तसेच तबला आणि गिटार, पियानो वरील सुर छेडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर जे आमोद यांनी केले.
बँड प्रलय चे उत्तम सादरीकरण
मुख्य कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी नागपूरकर युवकांचा "प्रलय बँड" ने त्यांच्या सादरीकरणातून उपस्थित यांचे मनोरंजन केले. त्यांनी उत्तम गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गायिका हर्षदा हिने गायिलेल्या गाण्यांच्या सुरांनी संपूर्ण वातावरण संगीतमय केलें.