69 वी महाराष्ट्र केसरी २०२६-२७ चा मान यंदा नागपूरला!
नागपुरात रंगणार कुस्तीचा भव्य महासंग्राम! ४२ शहर व जिल्हा संघांचा सहभाग; १,३०० मल्लांसह सुमारे १,७०० जणांची उपस्थिती अपेक्षित
Date : 17 Nov 2026
याप्रसंगी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस हिंद केसरी श्री. योगेश दोडके, श्री. दयाराम भोतमांगे, मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, श्री. रमेश खोडे, श्री. संदीप खरे, श्री. अविनाश लोखंडे, श्री. संजय तिरतकर यांच्यासह कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या स्पर्धेच्या आयोजनातून तरुणांना नशामुक्ती आणि सौष्ठीकरणाचा संदेश देणे आणि समाजात जागरूकता निर्माण करणे हा मूळ हेतू आहे. नागपूर शहर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी आमदार श्री. संदीपजी जोशी यांनी या स्पर्धेचे आयोजन नागपूर येथे करण्याबाबत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडे विनंती केली होती. त्यानुसार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या ठरावानुसार नागपूर येथे स्पर्धा आयोजित करण्यास अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी मा. महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधीपक्ष नेते श्री. संजय महाकाळकर मनपा आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, अतिरिक्त आयुक्त श्री. मुरुगानंथम, क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त श्री. मंगेश खवले, तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे राज्यातील महत्त्व
महाराष्ट्र केसरी स्पर्धेला राज्याच्या कुस्ती क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व असून, हा किताब महाराष्ट्रातील मल्लांसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा आणि मानाचा समजला जातो. राज्यातील विविध जिल्ह्यांतील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होऊन आपले कुस्ती कौशल्य, सामर्थ्य आणि गुणवत्ता पणाला लावणार आहेत.
गादी व माती या दोन्ही प्रकारांतील वरिष्ठ गटाच्या राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा पार पडणार असून, ‘महाराष्ट्र केसरी’ किताबासाठी होणाऱ्या अंतिम लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींचे लक्ष लागलेले असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील गुणवंत कुस्तीपटूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी प्रतिष्ठेचे राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
४२ शहर व जिल्हा संघांचा सहभाग; १३०० मल्लांचा समावेश!
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाशी संलग्न असलेल्या राज्यातील एकूण ४२ शहर व जिल्हा कुस्तीगीर संघांचा या स्पर्धेत सहभाग राहणार आहे. प्रत्येक शहर व जिल्हा संघातून गादी प्रकारातील १० वजनगटांमध्ये प्रत्येकी एक खेळाडू आणि माती प्रकारातील १० वजनगटांमध्ये प्रत्येकी एक खेळाडू, असे एकूण २० खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यानुसार ४२ संघांमधून गादी प्रकारात आणि माती प्रकारात असे एकूण १३०० खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
याशिवाय प्रत्येक संघासोबत दोन मार्गदर्शक आणि एक संघ व्यवस्थापक असे एकूण १२६ मार्गदर्शक व व्यवस्थापक उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेच्या नियोजनासाठी प्रथम श्रेणी अंतरराष्ट्रीय कुस्ती पंच प्रा. दिनेश गुंड स्पर्धा प्रमुख म्हणून तसेच १२५ तांत्रिक अधिकारी व २५ पदाधिकारी तसेच अनेक नामांकित मल्ल सहभागी होणार आहेत.
या सर्व आकडेवारीनुसार खेळाडू, मार्गदर्शक, व्यवस्थापक, पंच व पदाधिकारी मिळून अंदाजे १७०० जणांची उपस्थिती अपेक्षित आहे. त्यामुळे नागपूर येथे कुस्तीचा भव्य राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव अनुभवायला मिळणार आहे.
संभाव्य विजेते
महाराष्ट्र केसरीचे प्रबळ दावेदार म्हणून मागील महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर व पृथ्वीराज मोहोळ तर उप महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड, प्रकाश बनकर, जय पाटील, सिकंदर शेख व विराज चव्हाण असे नामांकित कुस्तीगीर या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
भव्य आयोजन आणि नियोजन
या स्पर्धेचे आयोजन भव्य, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्याचा मानस असून, राज्यातील सर्व संलग्न शहर व जिल्हा कुस्तीगीर संघ, आयोजक संस्था आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून स्पर्धेचे नियोजन करण्यात येणार आहे. सहभागी खेळाडू, मार्गदर्शक, व्यवस्थापक, पंच आणि पदाधिकाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विशेष नियोजन करण्यात येणार आहे.
विदर्भाच्या कुस्ती क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण पर्व
विदर्भाला कुस्तीची समृद्ध परंपरा लाभली असून, महाराष्ट्र केसरीसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे आयोजन नागपूर येथे होणे ही संपूर्ण विदर्भासाठी अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नामांकित मल्ल नागपूर येथे दाखल होणार असल्याने नागपूर शहर कुस्तीमय होणार आहे. या स्पर्धेमुळे विदर्भातील कुस्तीला नवी ऊर्जा, प्रोत्साहन आणि व्यापक व्यासपीठ मिळण्यास मदत होणार असून, स्थानिक क्रीडा क्षेत्रालाही मोठी चालना मिळणार आहे.
नागपूर शहरातील कुस्तीपटूंनी, शहरातील आणि विदर्भातील विविध क्रीडा संस्थांच्या खेळाडूंनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन यावेळी मनपा तर्फे करण्यात आले आहे.
महाराष्ट्र केसरी हा केवळ एक किताब नसून महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेचा मानबिंदू आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे आयोजन यंदा नागपूर येथे होत असल्याचा आम्हाला आनंद आहे. राज्यातील सर्व गुणवंत मल्लांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेचा गौरव अधिक उंचावणे, हा आमचा प्रयत्न राहील.
रामदासजी तडस, अध्यक्ष- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ :
राज्यातील ४२ शहर व जिल्हा कुस्तीगीर संघांच्या सहभागातून ही स्पर्धा भव्य स्वरूपात पार पडणार आहे. स्पर्धेचे तांत्रिक नियोजन, शिस्त आणि आयोजनाचा दर्जा उत्कृष्ट राहावा, यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ, नागपूर शहर जिल्हा कुस्तीगीर संघ आणि नागपूर महानगरपालिका यांच्या समन्वयातून आवश्यक नियोजन करण्यात येईल.
योगेश दोडके, सरचिटणीस- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ
स्पर्धेच्या पुढील नियोजनाबाबत: स्पर्धेच्या तारखा, निश्चित स्थळ, वजन गटनिहाय सविस्तर कार्यक्रमपत्रिका, प्रवेशिका सादर करण्याची प्रक्रिया तसेच इतर आवश्यक सूचना याबाबतची माहिती नागपूर शहर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी आमदार श्री. संदीपजी जोशी हे देतील तसेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
नागपूरच्या भूमीत महाराष्ट्रातील कुस्तीचा हा मानाचा महासंग्राम रंगणार असल्याने विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे.