बसथांब्यांच्या रॉयल्टीतून होणार मनपाच्या उत्पन्नात वाढ
मनपाच्या परिवहन समितीच्या बैठकीत 50 टक्के वाढीचा निर्णय
Date : 17 Nov 2026
नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन समितीची बैठक समितीच्या सभापती श्रीमती मंगला खेकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. 17) डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समितीच्या सभागृहात पार पडली. यावेळी उपसभापती श्री. सुधीर राऊत, सदस्य श्रीमती रुपाली ठाकूर, श्री. विजय होले, श्री. दिनेश यादव, श्रीमती प्रमिला मथरानी, श्रीमती पूजा पाठक, श्रीमती अर्चना पडोळे, श्रीमती मंगला मस्के यांच्यासह अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी श्री. योगेश लुंगे, श्री. राजीव घाटोळे उपस्थित होते.
मे. साईनपोस्ट इंडीया लिमीटेड या संस्थेमार्फत बीओटी तत्वावर नागपूर शहरातील विविध ठिकाणी आधुनिक बसथांब्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. या करारानुसार या संस्थेला सदर बसथांब्यावर जाहीरात प्रदर्शित करण्याचे हक्क दिले आहेत. या संस्थेसोबत असलेल्या कराराला पुन्हा पाच वर्षांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव बैठकीत चर्चेला आला. यात प्रशासनाने रॉयल्टी दरात 30 टक्क्यांनी वाढ करण्याची शिफारस केली होती. यावेळी समितीच्या सदस्यांनी रॉयल्टी दरात 50 टक्क्यांनी वाढ करण्याची सूचना केली. यासूचनेला समितीच्या सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली.
परिवहन विभागाचा अभ्यास दौरा
देशातील प्रमुख शहरातील परिवहन व्यवस्था कशी आहे, याचा अभ्यास करण्यासाठी परिवहन समितीच्या सदस्यांचा अभ्यास दौरा करण्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली. चेन्नई, बेंगलुरू, दिल्ली व सूरत या शहरांपैकी कोणत्याही दोन शहरांतील परिवहन व्यवस्थेचा दोन गट अभ्यास दौरा करणार आहे. या अभ्यास दौर्यात बस ताफ्याचे प्रभावी व्यवस्थापन, डेपो व्यवस्थापन, डिजीटल तिकीट प्रणाली, सार्वजनिक खासगी भागीदारी, महसूल वाढ, मेट्रो फिडर सेवांचे एकत्रीकरणाच्या संदर्भात या शहरांमध्ये असलेल्या प्रणालीची हा अभ्यासगट पाहणी करणार आहे.