लंडन स्ट्रीटवरील कचऱ्याची समस्या २४ तासांत निकाली
Date : 20 Nov 2026
नागरिकांचा जागरूक सहभाग आणि प्रशासनाची तत्पर कृती यांचा संगम साधत स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी नागपूरच्या दिशेने महानगरपालिकेची वाटचाल सुरू आहे. " >
लंडन स्ट्रीट परिसरात साचलेल्या कचऱ्यामुळे निर्माण झालेल्या अस्वच्छतेचा मुद्दा सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आणण्यात आला होता. याची दखल घेत महापौर नीता ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील नागपूर महानगरपालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली. स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे यांनीही या समस्येची वैयक्तिक दखल घेत संबंधित विभागाच्या पथकाला त्वरित स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार मनपाच्या संबंधित पथकाने तत्परतेने कार्यवाही करीत अवघ्या २४ तासांत संपूर्ण परिसर स्वच्छ केला.
नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडलेल्या नागरी समस्यांची दखल घेऊन त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही करणे, हा महानगरपालिकेच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचा महत्त्वाचा भाग आहे. लंडन स्ट्रीट येथील स्वच्छता मोहिमेतून नागरिकांचा जागरूक सहभाग आणि प्रशासनाची तत्परता यांचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.
यासंदर्भात स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे म्हणाल्या, "नागरिकांनी आपल्या परिसरातील स्वच्छतेसंदर्भातील समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेल्या या तक्रारीची तातडीने दखल घेऊन संबंधित विभागाला कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या तक्रारी केवळ ऐकून न घेता त्यांचे प्रत्यक्ष निराकरण होणे महत्त्वाचे आहे. स्वच्छ, सुंदर आणि निरोगी नागपूर घडविण्यासाठी महानगरपालिका प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे."
महापौर नीता ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि नागरी सुविधांबाबत महानगरपालिका प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनीही कचरा निर्धारित ठिकाणीच टाकावा, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करू नये आणि आपल्या परिसरातील स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
नागरिकांचा जागरूक सहभाग आणि प्रशासनाची तत्पर कृती यांचा संगम साधत स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी नागपूरच्या दिशेने महानगरपालिकेची वाटचाल सुरू आहे.