संभाव्य पाणी टंचाई बघता 'कारंजे' ठेवणार बंद
स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे यांच्या निर्देश
Date : 20 Nov 2026
शहरातील सार्वजनिक ठिकाणांचे सौंदर्य आणि स्वच्छता जपण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. याच अनुषंगाने कारंज्याचा प्रश्न नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या समन्वयातून यशस्वीरीत्या मार्गी लावण्यात आला असून, हे कारंजे पुन्हा सुरू करण्यात आले होते. परंतु, संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता शहरातील काही ठिकाणचे कारंजे बंद ठेवण्याचे तसेच प्रासंगिक देखभाल दुरुस्तीसाठी काही वेळ कारंजे सुरू ठेवण्यात येतील अशी माहिती स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी कारंजे बंद असल्याच्या समस्येकडे नागरिकांनी लक्ष वेधल्यानंतर स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे यांनी या प्रकरणाची वैयक्तिक दखल घेतली. संबंधित उद्यान विभाग तसेच इतर आवश्यक विभागांशी समन्वय साधत त्यांनी कामाचा सातत्याने पाठपुरावा केला. अवघ्या तीन दिवसांत आवश्यक कार्यवाही पूर्ण करून कारंजे पुन्हा कार्यान्वित करण्यात प्रशासनाला यश आले. परंतु, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कारंजे बंद ठेवण्याचे निर्देश स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांनी दिले आहे. तसेच याकरिता नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.