उपमहापौर लीला हाथीबेड अन् आयुक्त डॉ. विपीन यांनी केली हुडकेश्वर भागाची पाहणी
हुडकेश्वर-नरसाळ्यातील अंतर्गत रस्त्यांचे संपूर्ण डांबरीकरण दोन महिन्यात करण्याचे निर्देश १६५ किलोमीटर सिव्हर लाईनचे काम अंतिम टप्प्यात
Date : 23 Nov 2026
हुडकेश्वर-नरसाळ्यात सिव्हरेज लाईन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करताना केवळ खोदकाम झालेल्या भागाचे डांबरीकरण न करता संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेने हुडकेश्वर परिसरात डांबरीकरण मॉडेल रस्त्याची निर्मिती केली आहे. याच धर्तीवर हुडकेश्वर आणि नरसाळा परिसरातील उर्वरित रस्त्यांचेही संपूर्ण डांबरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पुढील दोन महिन्यांत ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी हनुमाननगर झोन सभापती श्रीमती ज्योती देवघरे, नगरसेवक श्री. अजय बोढारे, श्री. अजय हाथीबेड यांच्यासह अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बनर्जी, श्री. विजय गुरुबक्षणी, सहायक आयुक्त श्री. नरेंद्र बावनकर, कार्यकारी अभियंता श्री. नरेश सिंगमजूडे, श्री. रवींद्र बुंधाडे, उपअभियंता श्री. दीपक मेश्राम, श्री. सारंग पिंपळकर आणि श्री. प्रल्हाद पाटील उपस्थित होते.
दौऱ्यादरम्यान उपमहापौर श्रीमती लीला हाथीबेड आणि नगरसेवक श्री. अजय बोढारे यांनी हुडकेश्वर परिसरातील विविध रस्त्यांच्या दुरवस्थेकडे आयुक्तांचे लक्ष वेधले. रस्त्यांची दुरुस्ती आणि डांबरीकरण तातडीने करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत नगरसेवक अजय बोढारे यांनी आयुक्तांकडे लक्ष वेधत अतिक्रमणे हटविण्याची मागणी केली.
अमृत योजनेअंतर्गत सिव्हरेज पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले होते. त्यानंतर रस्त्यांची पुनर्बांधणी करताना अनेक ठिकाणी केवळ खोदकाम झालेल्या मधल्या पट्ट्याचे डांबरीकरण करण्याऐवजी संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. मनपाने तयार केलेला हा मॉडेल रस्ता परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार असून, याच पद्धतीने इतर रस्त्यांचीही कामे करण्याचा निर्णय पाहणीदरम्यान घेण्यात आला.
१६५ किलोमीटर सिव्हर लाईनचे कामापैकी १२० किलोमीटरचे काम पूर्ण
साऊथ सिव्हरेज झोनअंतर्गत हुडकेश्वर आणि नरसाळा परिसरात एकूण १६५ किलोमीटर लांबीची सिव्हर पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. यापैकी आतापर्यंत १२० किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामही नियोजनानुसार पूर्ण करण्यात येणार असून, सिव्हरेजचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित रस्त्यांची पुनर्बांधणी करण्यात येत आहे. यावेळी आयुक्त डॉ. विपीन यांनी उर्वरित रस्त्यांचे डांबरीकरणही याच मॉडेल रस्त्याच्या धर्तीवर करण्याचे निर्देश दिले. रस्त्याच्या केवळ खोदलेल्या भागाची दुरुस्ती न करता संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण केल्यास रस्त्याची गुणवत्ता, मजबुती आणि एकसमान पातळी राखण्यास मदत होईल. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी या पद्धतीचा अवलंब करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच रस्त्यांच्या कामांचा दर्जा राखण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या हॉट मिक्स प्लांटमधूनच डांबरीकरणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून घेण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित अभियंत्यांना दिले. याशिवाय जिल्हा नियोजन विकास निधीच्या माध्यमातून मनपाला निधी प्राप्त होणार असून, त्यातून रस्त्यांच्या पुनर्बांधणीची कामे करण्यात येतील. उर्वरित आवश्यक निधी मनपाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
यावर आयुक्त डॉ. विपीन यांनी संबंधित झोन स्तरावरून अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्याचे निर्देश दिले. रस्ते मोकळे ठेवणे, वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे आणि नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाने भर द्यावा, असेही त्यांनी सूचित केले.