संत सज्जनांची संगत लाभल्यास थेट दैवाशी संवाद ; ह.भ.प.सोपानदादा कानेरकर
‘जय जय रामकृष्ण हरी!.’ च्या गजरात रंगला मनपाचा महापौर कीर्तन महोत्सव ह.भ.प. सोपानदादा कानेरकर महाराज यांच्या जाज्वल्य वाणीतून हरिनामाचा जागर
Date : 24 Nov 2026
कार्यक्रमाला दक्षिण नागपूरचे आमदार श्री. मोहन मते, महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, परिवहन समिती सभापती श्रीमती मंगला खेकरे, माजी आमदार श्री. सुधाकर कोहळे, माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी, क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड, जलप्रदाय विशेष समिती सभापती श्रीमती दिव्या धुरडे, अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती श्रीमती रूपाली ठाकूर, नेहरूनगर झोन सभापती श्रीमती सीमा ढोमणे, हनुमाननगर झोन सभापती श्रीमती ज्योती देवधर, शिवसेना गटनेते श्री. गणेश चार्लेवार, शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटनेते श्री. किशोर कुमेरिया, गटनेते श्री. शकील पटेल, नगरसेवक श्री. विजय (पिंटू) झलके, श्री. चंद्रकांत खंगार, श्री. शेषराव गोतमारे, श्री. मनोज साबळे, नगरसेविका श्रीमती मानसी शिमले, श्रीमती वैशाली उदापूरकर, श्रीमती मंगला मस्के आणि मनपा क्रीडा अधिकारी डॉ.पियुष आंबुलकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी प्रास्ताविकातून नागपूर महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात आहे. वैकुंठ चतुर्दशीच्या निमित्ताने तरुण पिढीला सनातन संस्कृतीशी जोडण्यासाठी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्रीमती ठाकरे यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी नगरसेवक श्री. विजय (पिंटू) झलके यांनी घेतलेल्या परिश्रमांचा उल्लेख करून त्यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचे आभार व्यक्त केले. विशेष म्हणजे, महोत्सवानिमित्त सकाळी रांगोळी स्पर्धा आणि सायंकाळी भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार श्री. मोहन मते यांनी महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या पुढाकारातून दक्षिण नागपुरात वारकरी संप्रदायाला एकत्र आणण्याचे कार्य झाल्याचे सांगितले. क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड यांच्या सहभागातून आयोजित अशा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात जनजागृती आणि सांस्कृतिक मूल्यांचे संवर्धन होते, दक्षिण नागपुरातील इतर नगरसेवकांनीही अशा कार्यक्रमांचे आयोजन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कीर्तनातून ह.भ.प. सोपानदादा कानेरकर महाराज यांनी संतसंगतीचे महत्त्व विशद केले. संतांच्या आणि भगवंतांच्या मार्गावर चालताना स्वार्थ व परमार्थ कसा साधावा, याचा अर्थ सांगणारा अभंग त्यांनी सादर केला. संतांची व सज्जनांची संगत लाभल्यास दैवाशी संवाद साधल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. संगतीमुळे भगवंताचे दैवी रूप अनुभवता येते, तर संतांच्या मार्गाने व शास्त्रानुसार आचरण केल्यास भौतिक जीवनालाही प्रासादिक स्वरूप प्राप्त होते, असे त्यांनी सांगितले. ‘भारत माता की जय’चा जयघोष करण्याचे आवाहन करीत त्यांनी नागपूर महानगरपालिकेचा ‘धनवान, कुळवान आणि चरित्रवान’ असा उल्लेख करून महोत्सवाच्या आयोजनाचे कौतुक केले. संत तुकडोजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंगांच्या माध्यमातूनही त्यांनी संत संगतीचे महत्त्व पटवून दिले.
रांगोळी स्पर्धेत श्रीमती प्रेमा रेके प्रथम
महोत्सवानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेत श्रीमती प्रेमा रेके (सांकेतिक क्रमांक २७) यांनी प्रथम, श्रीमती आराध्या मांडवकर (२९) यांनी द्वितीय, तर श्रीमती अंकिता तेटे (४५) यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. प्रोत्साहनपर पारितोषिके श्रीमती मयुरी वैरागडे (१२), श्रीमती वर्षा मेंढे (८), श्रीमती सपना भालेकर (१६), श्री. स्वप्नील नवलाखे (४७), श्रीमती विद्यानी जिचकार (३०), श्रीमती सुजाता बोडखे (६७), श्रीमती युवांक्षी पराले (१९), श्रीमती पूजा चव्हाण (२२), श्रीमती मीनल कुबडे (३४) आणि श्रीमती श्रुतिका रोकडे (३) यांना प्रदान करण्यात आली.
दिंडी स्पर्धेत रमणा मारोती मंडळाने प्रथम
दिंडी स्पर्धेत रमणा मारोती मंडळाने प्रथम, तर जय गजानन मंडळ, सहकार नगर यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. भजन स्पर्धेत चैतन्य भजन मंडळाने प्रथम, नारी शक्ती भजन मंडळाने द्वितीय, तर श्री शिवशक्ती भजन मंडळाने तृतीय क्रमांक पटकाविला.
लाभली वाद्यवृन्दांची साथ
कीर्तनाला श्री. रोशन महाराज केवटे यांनी पखवाजाची साथ दिली. श्री. शुभम महाराज देहनकर, श्री. उज्ज्वल महाराज उरकडे, श्री. कुणाल महाराज पांडे आणि श्री. आदित्य महाराज वाशिमकर यांनी गायन केले, तर श्री. रुद्र महाराज तिजारे आणि श्री. अर्षित महाराज अलवारे यांनी टाळकरी म्हणून साथसंगत केली. महोत्सवाला वारकरी संप्रदायासह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.