प्रभाग २६ मधील रस्त्यालगतचा कचरा हटविला
नागरिकांच्या समस्यांवर मनपा प्रशासनाची तत्पर कार्यवाही
Date : 24 Nov 2026
प्रभागातील विविध समस्यांसह रस्त्यालगत टाकण्यात आलेला कचरा आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या अस्वच्छतेचा मुद्दा लक्षात घेत महापौर निता ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका प्रशासनाने संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांनीही या समस्येकडे लक्ष देत संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून स्वच्छतेच्या कामाचा पाठपुरावा केला. त्यानुसार मनपाच्या स्वच्छता पथकाने परिसरातील कचरा उचलून रस्ता स्वच्छ केला.
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यामुळे निर्माण होणारी अस्वच्छता, दुर्गंधी तसेच मोकाट जनावरांमुळे उद्भवणाऱ्या समस्यांचा विचार करता अशा ठिकाणांची नियमित स्वच्छता आणि देखरेख करणे आवश्यक आहे. नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता महानगरपालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
यासंदर्भात स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे म्हणाल्या, "वृत्तपत्रां सह विविध माध्यमातून नागरिकांच्या परिसरातील समस्या प्रशासनापर्यंत पोहोचतात. अशा वृत्तांची सकारात्मक दखल घेऊन संबंधित विभागामार्फत तातडीने कार्यवाही होणे महत्त्वाचे आहे. प्रभाग क्रमांक २६ मधील रस्त्यालगतच्या कचऱ्याची समस्या निदर्शनास येताच ती दूर करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. नागरिकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी परिसर उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध आहे."
नागरिकांनी आपल्या परिसरातील स्वच्छता आणि नागरी सुविधांशी संबंधित समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात. प्राप्त तक्रारी व सूचनांची दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. नागरिकांचा सहभाग आणि प्रशासनाची तत्परता यांच्या समन्वयातून स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी नागपूर घडविण्याचा महानगरपालिकेचा संकल्प अधिक बळकट होत आहे.